- कोरोना होऊ द्या मात्र, ऑनलाईन सभेचा डाव हाणून पाडू..
- विरोधकांचे टीकास्र…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१. मे. २०२१) :- कोरोनाचे दिवसाला दोन हजार रुग्ण असताना सभागृहातून सर्वसाधारण सभा घेतली. आता दिवसाला सहाशे रुग्ण सापडत असताना ऑनलाईन सभेचा घाट घातला, अशी टीका विरोधकांनी केली. तर राज्य सरकारच्या आदेशाने सभा कामकाज केले जात आहे, टीका करणाऱ्यांनी सरकारला विचारावे, असा प्रश्न कक्षातून सत्ताधाऱ्यांनी केला आहे.
पिंपरी – चिंचवड महापालिकेची मे महिन्याची सर्वसाधारण सभा गुरुवारी झाली. महासभेचे ऑनलाइनपणे कामकाज पार पडले. त्यात नगरसदस्यांचे आवाज सुस्पष्ट येत नव्हते. तर महापौर निर्देश देताहेत हे सदस्यांना कळत नव्हते. तांत्रिक अडचणीमुळे तासाभरातच महापालिकेची सभा उरकावी लागली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर उषा ढोरे होत्या. तर या सभेसाठी काही पदाधिकारी, गटनेते त्यांच्या केबिनमधून, काही नगरसेवक स्थायी समिती सभागृहातून तर, काही नगरसेवक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. नगरसेवक आणि अधिकारी असे १०० जणांनी सभेत सहभाग घेतला.
महासभेचे कामकाज करताना अनेक तांत्रिक अडचणी आल्या. कोणाचा कोणाला ताळमेळ लागत नव्हता. कोण विषय वाचतेय, कोण उपसूचना मांडतेय, कोण बोलत आहे. हे काहीच लक्षात येत नव्हते. अनेक नगरसेवकांचा आवाजही सुस्पष्ट येत नव्हता. त्यामुळे अडथळे निर्माण झाले. तर महापौरांनी एकाला बोलायला संधी दिली की दुसरा मधेच बोलत होता.
आम्ही पॉझिटिव्ह झालो तरी चालेल; पण सभागृहात येणार आहोत. यापुढे ऑनलाईन सभा चालू देणार नाही, असा इशाराही विरोधकांनी दिला. महापालिका सभेत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. ऑनलाईन सभेच्या माध्यमातून काही घोटाळे केले जातील, हे आम्हाला कळणार नाही. आम्हाला जनतेने निवडून दिले आहे. त्यांचे प्रश्न सभागृहात मांडणे आमचे कर्तव्य आहे, अशा भावना विरोधकांनी व्यक्त केल्या.


















