- निविदेला किती प्रतिसाद मिळेल माहित नाही..
- आयुक्त पाटील यांचा पालिकेच्या १५ लाख डोस खरेदीवर प्रकाशझोत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२. मे. २०२१) :- कोरोना प्रतिबंधक लसीबाबत जागतिक निविदा (ग्लोबल टेंडर) काढूनही लस मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे नुसती स्टंटबाजी म्हणून निविदा काढायची का? असा प्रश्न पडला आहे. तरीही पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून एकत्रित निविदा राबविण्याची चर्चा सुरु आहे. त्याला किती प्रतिसाद मिळेल माहित नाही, असे मत आयुक्त राजेश पाटील यांनी बुधवारी (दि. १९) व्यक्त केले. ते पत्रकारांशीबोलत होते.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून वाचण्याकरिता प्रत्येक नागरिकाला महापालिका मोफत लस देणार आहे. त्यासाठी ग्लेबल टेंडर काढण्यात यावे, असे पत्र महापौर उषा ढोरे यांनी आयुक्त पाटील यांना दिले आहे. तसेच, स्थायी समितीचे अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे यांनीही तशी सूचना केली आहे.
आयुक्त म्हणाले की, सद्यः स्थितीत सर्वत्र लसीचा तुटवडा असल्याने लसीकरण मोहीम संथ गतीने सुरु आहे. सरकारने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण थांबविले आहे. शहरात याच वयोगटांची लोकसंख्या १२ लाख आहे. दोन डोस धरून एकूण २४ ते २५ लाख लसी पालिकेस लागणार आहेत. त्या तुलनेत लसीची तातडीची गरज आहे. त्यासाठी पालिका ग्लोबल टेंडर काढण्याचा विचार करीत आहे.
पुणे महापालिकेने त्याबाबत तयारी केली आहे. पुणे महापालिकेच्य आयुक्तांशी चर्चा केली आहे. तसेच, महापौर व पक्षनेते तेथील पदाधिकाऱ्यांशी बोलले आहेत. पुणे व पिंपरी – चिंचवड पालिकेचे एकत्रित टेंडर राबविण्याबाबत चाचपणी सुर आहे. मात्र, टेंडरच्या जाहिरातीसाठी मोठा खर्च करावा लागणार आहे, त्याला औषध कंपन्या किती प्रतिसार देतील, याबाबत सांशकता आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.


















