- इमारत उभारणी व इतर कामांचा २०२१-२२ च्या अंदाजपत्रकात समावेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२. मे. २०२१) :- पिंपरीतील महिंद्रा कंपनीच्या जागेवर मुख्य अग्निशामक केंद्र इमारत बांधणे आणि इतर अनुषंगिक कामे करणे या कामाचा समावेश सन २०२१-२२ च्या अंदाजपत्रकात करण्यात आला आहे.
या कामास १५ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. मुख्य अग्निशामक केंद्र इमारत बांधणे आणि इतर अनुषंगिक कामे अद्ययावत पध्दतीने करायची असल्यामुळे या कामासाठी एकूण ८० कोटी रुपये खर्चास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
संत तुकारामनगर येथील अग्निशामक दलाच्या इमारतीची जागा अपुरी पडत आहे. पिंपरी प्रभाग क्रमांक ९ येथील जागा मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे या जागेवर सर्व साधन सुविधायुक्त सुसज्ज मध्यवर्ती मुख्य अग्निशामक केंद्र उभारणे आवश्यक आहे. महिंद्रा कंपनीचे असणारे औद्योगिक क्षेत्र निवासी क्षेत्रामध्ये आल्याने २४ हजार ५४४ चौरस मीटर (सहा एकर) जागा अमेनिटी स्पेस म्हणून १२ मार्च २०२१ रोजी महापालिकेच्या ताब्यात आले आहे.


















