- मेट्रो मार्गिका व स्टेशनसाठी ९४६ कोटी ७३ लाखांचा खर्च…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४. मे. २०२१) :- महामेट्रोच्या वतीने पिंपरी ते स्वारगेट या मार्गावर पुणे मेट्रो मार्गिकचे काम सुरू आहे. त्या कामासोबत निगडीपर्यंतच्या ४.४१ किलोमीटर अंतराच्या विस्तारीत मार्गाचे काम केले जाणार आहे. त्यासाठी ९४६ कोटी ७३ लाख खर्च येणार आहे.
त्यापैकी पालिका आपल्या हिस्साची खर्चाची रक्कम समभागाऐवजी अनुदान स्वरूपात देणार आहे. त्यास पालिका सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे. त्यामुळे विस्तारीत मार्गातील खर्चाचा मोठा अडथळा दूर झाला आहे. पालिकेच्या गुरूवारी (दि.२०) झालेल्या ऑनलाइन सभेत या निर्णयास ऐनवेळी मंजुरी देण्यात आली.
या विस्तारीत मार्गासाठी १ हजार ४८ कोटी २२ लाखांचा खर्च अपेक्षित होता. केंद्र शासनाने आपल्या हिश्श्याचे २० ऐवजी केवळ १० टक्के निधी देण्यास मंजुरी दिली. खर्च कमी करण्यासाठी मेट्रोचे डबे खरेदी व डेपो निर्माण करण्याचे काम वगळण्यात आले. त्यामुळे एकूण १०१ कोटी ४९ लाख रूपयांनी खर्च कमी करण्यात आला. त्यामुळे मेट्रो मार्गिका व स्टेशनसाठी ९४६ कोटी ७३ लाख खर्च होणार आहे.

















