- नॉन कोविड रुग्णांना दिलासा..
- कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटल्याने पालिकेचा निर्णय..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मे. २०२१) :- शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटल्याने इतर रूणांवर उपचार करण्यासाठी महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रूग्णालयातील बाह्यरूग्ण सेवा विभाग (ओपीडी) शुक्रवार (दि.२८) पासून सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे इतर आजाराच्या रुग्णांना पूर्वीप्रमाणे सवलतीमध्ये उपचार मिळणार आहेत.
शहरातील महापालिकेची सर्वच रुग्णालये कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी राखीव करण्यात आली आहेत. सध्या रुग्णांची संख्या घटत चालली आहे. तर दुसरीकडे इतर आजारांच्या रुग्णांना पालिका रुग्णालयात उपचार मिळत नाहीत. त्यामुळे त्यांना खासगी रुग्णालये शोधत फिरावे लागत आहेत. उपचार घ्यावे लागत आहेत. तेथे भरमसाट बिले आकारले जाऊन रुग्णांची आर्थिक लुट होत आहे.
या संदर्भात महापालिका पदाधिकारी व नगरसेवकांनी तसेच, विविध सामाजिक संघटनांनी महापालिकेकडे पालिका रुग्णालयात इतर आजारांवर पूर्वीप्रमाणे उपचार दिले जावेत, अशी मागणी केली होती. त्यानुसार वायसीएम रूग्णालयातील ओपोडी तातडीने सुरू करण्याचे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत. शुक्रवारपासून वायसीएममधील ओपोडी कार्यान्वित केली जाईल, असे रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश वाबळे यांनी सांगितले.