न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ डिसें.) :- कोणताही कायदेशीर अधिकार नसताना अशासकीय सदस्य म्हणून महावितरणच्या व्यापारी चिन्हाचा (लोगो) वैयक्तिक वापर केल्याप्रकरणी जिल्हा विद्युत सनियंत्रण समितीचे सदस्य संतोष सौंदणकर यांच्याविरुद्ध महावितरणकडून पुणे येथील दिवाणी न्यायालयामध्ये (वरिष्ठ स्तर) दावा दाखल करण्यात आला आहे. तसेच महावितरणचे विद्युत ठेकेदार म्हणून काम करताना अनेक ठिकाणी निकृष्ट काम केल्याचे आढळून आल्याप्रकरणी संतोष सौंदणकर यांची न्यू सिमरन इलेक्ट्रीकल ही संस्था पाच वर्षांसाठी महावितरणच्या काळ्या यादीत टाकण्यात आली आहे.
याबाबत सौंदणकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे खुलासा केला असून, महावितरणाने माझ्यावर केलेले आरोप धांदांत खोटे असल्याचे सांगितले आहे. वरील विषयांचा खुलासा करताना सौंदणकर म्हणाले की, प्रादेशिक संचालक, पुणे यांनी माझ्या विरोधात तत्कालीन मुख्य अभियंता यांना हाताशी धरून मा. जिल्हाधिकारी, पुणे यांना दिनांक १५/०३/२०१८ रोजी, माझे पुणे जिल्हा सनियंत्रण समिती अशासकीय सदस्य पद रद्द करणेबाबत निवेदन दिले. सौंदणकर हे पत्रव्यवहारमध्ये वापरलेल्या लेटरहेडवर व व्हिजिटिंग कार्डवर महावितरणच्या शासकीय लोगोचा अनधिकृत वापर करून जणू ते महावितरण कंपनीचे मोठे अधिकारी असल्याचे भासवीत असतात. अधिकारी व अभियंता यांच्यावर दवाब आणून बेकायदेशीर कामे ते करून देण्यासाठी भाग पडतात, अशा प्रकारे सौंदणकर हे महावितरणच्या शासकीय लोगो चा वापर करू शकत नाही. कारण ते कुठल्याही प्रकारे महावितरणचे कामगार नाहीत व ही बेकादेशीर कृती आहे. त्यामुळे त्यांचे विरुद्ध महावितरणतर्फे फौजदारी कार्यवाही करण्याचे नियोजन आहे, अशा आशयाचे पत्र दिले गेले.
त्यावरही समाधान न झाल्यामुळे आपण माझ्या विरोधात महावितरण कंपनीचा लोगो वापरला, म्हणून ५० लाख रुपयांचा दावा लावण्यासंबंधी वकीलामार्फत नोटीस पाठविण्यात आली. मात्र इतर सदस्य हे देखील महावितरण कंपनीचा लोगो वापरतात. त्यांना मात्र लोगो वापरला म्हणून कोणतीही नोटीस अथवा त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. पुणे जिल्हा विद्युत सनियंत्रण समितीने आपणास वेळोवेळी जो पत्र व्यवहार केला तो देखील महावितरणचा लोगो असलेल्या लेटर हेडवर यामध्ये सर्व सभासदांचे पदनाम असताना केवळ माझ्याच विरुद्ध आकसाने कारवाई करण्यात येत आहे.
महावितरण पुणे परिमंडळमध्ये आपण बदलीमध्ये केलेला भ्रष्टाचार मी उघडकीस आणला. याबाबत मी गेली वर्षभरापासून सतत पत्र व्यवहार करीत आहे. दि.०२/०१/२०१८ रोजी मा. लोकायुक्त सो., म. राज्य, मुंबई. यांच्या कडे तक्रार दाखल केली आहे. त्या तक्रारीची सुनावणी तक्रार क्र. लोआ/कॉम/१०५/२०१८ (टे-१)सुनावणी १६८७/१८ दि. ०९/०३/२०१८ रोजी पुणे येथे झाली. सदस्य म्हणून काम करीत असताना दोन वर्षाच्या कालावधीमध्ये माझ्यावर कोणतेही आरोप करण्यात आले नव्हते. मात्र, मा. न्यायालयात तक्रार दाखल केल्यानंतर महावितरणने माझ्यावर आरोप केले आहेत.
प्रादेशिक संचालक सो., दि. १५/०३/२०१८ रोजी माझी बदनामी करण्यासाठी व त्रास देण्यासाठी माझ्यावर खोटे आरोप करून जा. क्र. मुअ/पुप/औसंवि/पु. जि. वि. नि. स. /१०४ दि. १५/०३/२०१८ च्या अनुषंगाने तत्कालीन मा. मुख्य अभियंता सो., पुणे यांना हाताशी धरून माझ्या विरोधात खोटी तक्रार मा. जिल्हाधिकारी सो., पुणे यांना देण्यास भाग पडले. या बाबतीत तत्कालीन मा. मुख्य अभियंता सो., पुणे यांनी दि. १४/०३/२०१८ रोजी मला प्रत्यक्ष भेटून प्रादेशिक संचालक, पुणे यांच्या सांगण्यावरून सदर तक्रारी अर्ज केला आहे. माझा त्यात काही हात नसल्याचे मला समक्ष भेटून सांगितले होते. त्याच पत्रात मा. जिल्हाधिकारी सो., पुणे यांना दिनांक १५/०३/२०१८ रोजी माझ्या विरोधात लोगो वापरण्यासंबंधी तक्रार केली आहे.
आपल्या माहितीसाठी मी हे स्पष्ट करू इच्छितो कि सनियंत्रण समिती पुणे जिल्ह्याच्या त्रैमासिक बैठकीत देखील समितीचे सचिव या नात्याने काम पाहणारे मा. मुख्य अभियंता यांनी, आपण लोगो वापरू नये अशा प्रकारचा कोणताही आदेश अथवा पत्र मला मा. जिल्हाधिकारी सो., पुणे यांना तक्रार केली त्या तारखे आधी दिले गेले नाही. दिनांक २०/०२/२०१८ पासूनच मी माझ्या लेटरहेड व व्हिजिटिंग कार्डचा वापर शिवसेनेचा लोगो वापरून सुरु केला आहे. आपल्या माहिती साठी सदर लेटर हेड बदली केल्यानंतरचे चे दुसरे पत्र मी मा. मुख्य अभियंता, पुणे यांना दिनांक २०/०२/२०१८ रोजी जावक नं. ९ च्या अन्वये लिहिले आहे. त्यामुळे माझ्या विरोधात दिनांक १५/०३/२०१८ केलेल्या तक्रारीला काहीच अर्थ राहत नाही, असेही सौंदणकर यांनी स्पष्ट केले आहे.
वारंवार मी महावितरणचे काम करतो, असे सांगतात मी महावितरणाचे कुठलेही काम केलेले नाही. जे काम मी ग्राहकाचे १.३% सुपर व्हिजन योजने अंतर्गत ग्राहक स्वतःसाठी स्वखर्चाने करतात, त्यांची कामे मी करतो. ग्राहक त्या कामासाठी महावितरणला १.३% दराने देखरीखीचे पैसे भरते व मी ठेकेदार म्हणून त्या त्या शाखा अभियंता यांच्या देखरखीखाली काम पूर्ण करतो. काम पूर्ण झाल्यावर ते काम महावितरण कंपनीकडे हस्तांतरित केले जाते. मी १.३% योजने अंतर्गत दोन वर्षापूर्वी पूर्ण केलेली कामे जी महावितरण कंपनीने स्वतः कडे हस्तांतरित करून घेतली आहेत. त्या कामांमध्ये खोट्या त्रुटी काढून, त्या त्रुटी काढण्यात याव्यात अशा विषयाचे विविध कार्यालयांच्या नोटीसा मला मे. न्यू सिमरन इंटरप्रायझेसच्या नावाने केवळ त्रास देण्याच्या हेतूने देण्यात आल्या आहेत. जेणेकरून मी त्यांच्या विरोधात करत असलेल्या तक्रारी मी मागे घेईल, असा प्रादेशिक संचालक मा. संजय कृष्णराव ताकसांडे यांचा होरा आहे.
वास्तविक पाहता पुणे जिल्ह्यात ५०० च्यावर ठेकेदार काम करीत आहेत. अंदाजे ३००० वर १.३% योजनेच्या अंतर्गत कामे पूर्ण झालेली आहेत. कामांच्या (random) पद्धतीने त्रुटी काढताना केवळ पुणे जिल्ह्यातून माझ्याच मे. न्यू सिमरन इंटरप्रायझेसच्या कामांची चौकशी करण्यात आली असून, माझ्या कामांची चौकशी होत असताना ती एकतर्फी होत असल्याचे सौंदणकर यांनी या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.










