- लसनिर्मिती पिंपरीत सहज शक्य असल्याच्या सुचनेची पालिकेकडून दखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मे. २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये कोविड १९ या महामारी विरुद्ध लढा देण्यासाठी लसनिर्मितीसाठी २५ कोटी रुपये पिंपरीतील “एच ए” या जगप्रसिद्ध कंपनीला देण्याचा ठराव संमत झाला आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण ठराव आमलात आला. त्यामुळे पिंपरीत लवकरच कोविडच्या विरुद्ध लसनिर्मिती प्रक्रिया सुरू होणार आहे.
दिनांक १ मे २०२१ रोजी प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील यांनी कोविड १९ विरुद्धच्या लस निर्मितीसाठी एक निवेदन प्रसिद्ध केले होते. त्यामध्ये पिंपरीतील हिंदुस्थान अँटीबाओटिक्स कंपनीमध्ये लासनिर्मिती शक्य असल्याचे प्रशासनास निदर्शनास आणून दिले होते. त्याकरिता राज्यातील प्रमुख शासकीय लसनिर्मिती संस्था हाफकीन ची मदत होईल असे सूचित केले होते.
या संदर्भात पाटील पुढे म्हणाले,” पिंपरीतील कोरोना बाधितांची संख्या आता दोन लाखाच्या पुढे गेलेली आहे. कोरोना संक्रमित मृतांचा आकडाही ६ हजार झाला आहे. अश्या गंभीर परिस्थितीत लस हा एकमेव पर्याय आता उरला आहे. त्यासाठी शहराला २० लाखापेक्षा जास्त लसींची आवश्यकता आहे. लसींचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यावर मार्ग काढण्यासाठी शहरात लसनिर्मितीसाठी प्रयत्न करणे दुरापास्त ठरते. त्याकरिता एच ए सारख्या नामवंत औषधी निर्मिती कंपनीची मदत शहराला नक्कीच संजीवनी ठरेल. आज पालिकेने त्या बाबत पुढाकार घेतला ही नक्कीच अभिमानास्पद बाब आहे. स्थायी समिती अध्यक्ष नगरसेवक नितीन लांडगे यांचे सुद्धा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहेत. महाराष्ट्र शासन व केंद्र सरकार नक्कीच पालिकेला सहकार्य करेल यात शंका नाही.”
















