न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८. मे. २०२१) :- स्वातंत्र्यवीर सावरकरांची देशभक्ती सर्वश्रृत असून त्यांनी स्वदेशीचा पुरस्कार करत देशासाठी दिलेले योगदान त्यांच्या देशाभिमानाची साक्ष देतात, असे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले, मुख्य सुरक्षा अधिकारी मेजर उदय जरांडे, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड, विभागाचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.
महापौर उषा उर्फ माई ढोरे म्हणाल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अंधश्रध्दा, जातीभेद निर्मूलनासाठी केलेले कार्य, त्यांची मातृभूमीबद्दल असलेली ओढ, त्यांनी युवकांचे उभारलेले संघटन अशा विविध कार्यातून सावरकरांनी वेगळा ठसा उमटविला. सावरकरांचा इतिहास देशभक्तीची साक्ष देत असून भारतीय इतिहासातले ते सुवर्णपान ठरले आहेत असेही महापौर माई ढोरे म्हणाल्या.
















