- अपंग बांधवांना मिळणार पहिल्या मजल्यावर सदनिका…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ मे. २०२१) :- पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने सेक्टर नंबर १२ मध्ये गृहप्रकल्प उभारण्यात येत आहे. २१ मे रोजी झालेल्या सोडतीमध्ये नंबर लागलेल्या अपंग बांधवांना पहिल्या मजल्यावर सदनिका पाहिजे असल्यास त्यांनी प्राधिकरणाकडे अर्ज करावेत, असे आवाहन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बन्सी गवळी यांनी केले आहे.
पिंपरी – चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने सेक्टर १२ मध्ये पंतप्रधान आवास योजनेसाठी सोडत काढण्यात आली. यामध्ये अपंगांचे आरक्षण हे पहिल्या मजल्यावर न ठेवता इतर मजल्यावर असल्यामुळे प्रहार अपंग क्रांती संघटनेने हरकत घेतली. अपंग व्यक्ती अधिनियम २०१६ नुसार अपंगांना पहिल्या मजल्यावर सदनिका देणे बंधनकारक असताना पिंपरी- चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने त्याकडे दुर्लक्ष केले. ही बाब प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांनी प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बन्सी गवळी व उपकार्यकारी अधिकारी आशा राणी पाटील यांच्या निदर्शन आणून दिली होती.
अपंगांनी प्राधिकरणाकडे अर्ज केल्यास त्याची पडताळणी करून निर्णय घेतला जाईल. विशेष कमरेखाली अपंगत्व असलेल्या अपंगांना पहिल्या मजल्यावर सदनिका दिली जाईल, कमोडची सुविधाही दिली जाणार असल्याचे गवळी यांनी म्हटले आहे.


















