- अत्यावश्यक सेवेतील मेडिकल व्यावसायिकांवर जाणूनबुजून कारवाईचा हेका..
- पांडाभाऊंच्या नेतृत्वाखाली व्यवसायिकांनी घेतली आमदार महेशदादांची भेट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ मे. २०२१) :- भोसरी मतदारसंघांतर्गत चिखली मोरेवस्ती व साने चौक परिसरात क्षेत्रीय कार्यालयाच्या भरारी पथकाकडून नियमांचा भंग करणारे सोडून अत्यावश्यक सेवेतील औषध विक्री करणाऱ्या दुकानांवर सातत्याने धाडी टाकल्या जात आहेत. एक हजारापासून पाच हजारापर्यंत दंडात्मक रकमेची कारवाई करण्यात येत आहे. मेडिकल व्यावसायिकांची ही व्यथा हेरून युवा नेते पांडाभाऊ साने यांनी मोरे वस्ती, साने चौक भागातील मेडिकल चालक-मालकांचे शिष्टमंडळ सोबत घेऊन थेट आमदार महेशदादा लांडगे यांचे कार्यालय गाठले. त्यांची भेट घेऊन या व्यवसायिकांच्या तक्रारी त्यांच्या कानी घातल्या तसेच त्यांना निवेदनही दिले.
यावेळी मेडिकल दुकान संघटनेचे उपाध्यक्ष नंदकुमार पानसरे, सेक्रेटरी सुरज चौधरी, गणेश नांगुडे, उमेश अनारसे, संतोष चिकने, किरण साळुंखे, सचिन मुळूक, भवरलाल चौधरी, श्रीकांत मते, योगेश चौधरी, सविंदर चौधरी, अक्षय गायकवाड, भुराराम चौधरी, मदन चौधरी, महेश कोरके आदी मेडिकल व्यावसायिक उपस्थित होते.
पांडाभाऊ साने म्हणाले, कोविड काळात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या औषध विक्रेत्यांवर क्षेत्रीय कार्यालयाच्या भरारी पथकाकडून दंडात्मक कारवाई होत आहे. नियमांचा भंग व बेशिस्तांवर कारवाई करायची सोडून हे भरारी पथक चोर सोडून सन्याशाला फाशी देत आहे. अव्यावहारिक कायदे-कानून यांचा धाक दाखवून मोरेवस्ती, साने चौकातील मेडिकल व्यावसायिकांकडून खंडणी उकळत आहे. ही बाब आमचे मार्गदर्शक आमदार महेशदादांच्या निदर्शनास आणून दिली.
आमदार लांडगे यांनी त्वरित महापालिका आयुक्त राजेश पाटील आणि संबंधित क्षेत्रीय अधिकारी यांना फोनद्वारे संपर्क करून औषध विक्रेत्यांवर महापालिकेच्या भरारी पथकाकडून होत असलेली कारवाई थांबवावी, अशी सूचना केली. तसेच औषध विक्रेत्यांना कारोना प्रतिबंधक लस त्वरित देण्यासाठी व्यवस्था करण्यात येईल, असेही आश्वासन यावेळी दिले.
– पांडाभाऊ साने (युवा नेते)…