- बारामतीसह मावळ आणि शिरुर लोकसभा मतदार संघाचा खासदार राष्ट्रवादीचाच होणार
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ डिसें.) :- ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने रविवारी (३०) जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याची माहिती देण्यासाठी शुक्रवार (दि. २८) रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव अॅड. संदीप कदम, माजी नगरसेविका शमीम पठाण, प्रवक्ते फजल शेख, विजय लोखंडे, सुनील गव्हाणे, वर्षा जगताप उपस्थित होते.
यावेळी विलास लांडे म्हणाले की, भाजपच्या राजवटीत महापालिकेत भ्रष्टाचार वाढला आहे. संत पीठाच्या धार्मिक कामात देखील सत्ताधा-यांनी पैसै खालले आहेत. संतपीठाच्या कामात पैसे खाऊन भाजपने कळसच केला आहे. सत्ताधारी जनतेच्या हिताची नव्हे तर स्वहिताची कामे करण्यात दंग आहे. जिथे पैसे मिळतील. तिच कामे केली जात आहे. सत्ता तुमची आहे. पण पैसे करदात्या जनतेचे आहेत, याचे भान सत्ताधा-यांना राहिले नाही. सगळी विकास कामे वाढीव दराची आहेत. रिंग करुन निविदा भरल्या जात असून तेच-तेच ठेकेदार येत आहेत. आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीची सत्ता येणार असून याची चौकशी केली जाईल.
तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत जनता खऱ्याला न्याय देणार असून, बारामतीसह मावळ आणि शिरुर लोकसभा मतदार संघाचा खासदार राष्ट्रवादी काँग्रेसचा होणार आहे. साहेब, दादा जो निर्णय घेतील. तो आम्हाला मान्य आहे. राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांची घरवापसी लवकरच होणार असल्याचे लांडे यांनी यावेळी सांगितले आहे.










