- नाव नोंदणीसाठी आयोजक जितेंद्र यादवांचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ मे. २०२१) :- चिखलातील स्वर्गीय अलकाताई यादव प्रतिष्ठाण आणि जय भवानी प्रतिष्ठाण यांच्या संयुक्त विद्यमाने चिखली गावासह पिंपरी चिंचवड शहरातील गोरगरीब कुटुंबातील मुला-मुलींसाठी मोफत विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सर्वधर्मियांसाठी हा मोफत विवाह सोहळा होणार आहे. यामध्ये वधू-वरांचा पोशाख, वऱ्हाडी मंडळींसाठी जेवण, संसारोपयोगी साहित्य (झाल), भटजी व लग्न समारंभासाठी अन्य आवश्यक बाबी मोफत पुरविण्यात येणार आहेत. हा विवाह समारंभ कोरोनाचे नियम व महापालिका आणि शासन निर्देशांचे पालन करून आयोजित करण्यात येणार आहे. आतापर्यंत सर्वधर्मीय मिळून एकूण आठ विवाहांची नोंद झाली आहे. कोरोना संकट असेपर्यंत ही नोंदणी सुरु राहणार आहे.
येत्या ४ जूनला दोन विवाह आयोजित करण्यात आले आहेत. उर्वरित विवाह टप्प्याटप्प्याने आयोजित केले जाणार आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने इच्छुकांनी या विवाह सोहळ्यात नाव नोदणी करावी, असे आवाहन चिखली गावातील जय भवानी प्रतिष्ठाणचे अध्यक्ष जितेंद्र यादव आणि त्यांच्या पत्नी शीतल यादव यांनी केले आहे.


















