- उद्योगांचा ऑक्सिजन पूर्ववत सुरू करा..
- लघु उद्योजक संघटनेचे अजितदादांना साकडे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ मे. २०२१) :- शहरात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असून, उद्योगांना ऑक्सिजन पूर्ववत सुरू करावा, अशी मागणी पिंपरी – चिंचवड लघुउद्योजक संघटनेकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे करण्यात आली आहे. संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, सचिव जयंत कड यांनी त्यांना निवेदन दिले आहे.
पिंपरी – चिंचवड परिसरात ११ ते १२ हजार लघू व मध्यम उद्योग आहेत. यातील पाच ते सहा हजार उद्योगांना औद्योगिक वापरासाठी ऑक्सिजनची गरज असते. कोरोनाची दुसरी लाट यंदा मार्चमध्ये आली. एप्रिलमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. त्यामुळे रुग्णांसाठी ऑक्सिजनची मागणी वाढली. परिणामी औद्योगिक वापरासाठीचा ऑक्सिजन गॅसपुरवठा पूर्णपणे थांबवण्यात आला. तो पुरवठा रुग्णालयांतील रुग्णांसाठी करण्यात आला. या कालावधीत उद्योजकांनी दुसऱ्या पर्यायांचा वापर केला. मात्र, तो पर्याय खूपच महागडा असल्याने परवडणारा नाही. मात्र, सध्या कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. त्यामुळे रुग्णांसाठी ऑक्सिजनच्या मागणीत मोठी घट होत आहे.
उत्पादकांकडे ३० ते ४० टक्के ऑक्सिजन शिल्लक रहात आहे. हा ऑक्सिजन पुरवठा थांबवण्यात आल्याने काही उद्योगांमधील उत्पादन थांबले होते. त्यामुळे उद्योजकांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागत होते. तसेच कामगारांनाही याचा फटका बसत आहे. ऑक्सिजन पुरवठा पूर्ववत सुरु झाल्यास या उद्योगांचे उत्पादन पुन्हा सुरु होण्यास मदत होईल. कामगारांनाही दिलासा मिळणार आहे. शिल्लक राहिलेला ऑक्सिजन उद्योगांना मिळाल्यास औद्योगिक कामकाज पूर्ववत सुरू करणे शक्य होणार आहे.
पालकमंत्री अजित पवार यांनी या मागणीची दखल घेतली आहे. उद्योगांना एका आठवड्यात ऑक्सिजनचा पुरवठा पूर्ववत करण्याबाबत कार्यवाही करावी, असे पवार यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना सांगितले आहे. – मा. संदीप बेलसरे (अध्यक्ष, पिंपरी चिंचवड लघु उद्योजक संघटना)…


















