- चार लाखांपेक्षा अधिकचा मुद्देमाल जप्त; गुन्हे शाखेची कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ जून २०२१) :- लेबर कॅम्पमधील मजुरांचे मोबाईल चोरणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून चोरीचे ३३ मोबाईल, रिक्षा व सोन्याचे दागिने असा एकूण चार लाख ७३ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने ही कामगिरी केली.
सुरेश ऊर्फ अण्णा बाबुदास वैष्णव (२६, रा. मु. पो. वरवे, ता. भोर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तसेच, त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिस निरीक्षक प्रसाद गोकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रात्रीच्या वेळी लेबर कॅम्पमध्ये चोरी करीत होते. मजुरांच्या मिळेल त्या वस्तू घेऊन ते पळ काढत. या गुन्ह्यांचा तपास करताना आरोपी मोबाईल विक्रीसाठी भूमकर चौकात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी ३३ मोबाईल चोरल्याची कबुली दिली. सोन्याचे दागिने आणि चोरीसाठी वापरत असलेली रिक्षा असा एकूण चार लाख ७३ हजार १०० रुपयांचा ऐवज हस्तगत केला.
मोबाईल चोरीबाबत हिंजवडी पोलिस ठाण्यात दोन, राजगड, भारती विद्यापीठ, हडपसर आणि वानवडी पोलिस ठाण्यात प्रत्येकी एक असे सहा गुन्हे दाखल आहेत. पोलिसांना आत्तापर्यंत मोबाईलधारक आणि सोन्याच्या दागिन्याच्या मालकाचा शोध लावला आहे. उर्वरित मोबाईलच्या मालकांचा शोध सुरू असून त्यापैकी बहुतांश मालक कोविडच्या साथीमुळे आपल्या मूळगावी गेले आहेत. आरोपी वैष्णव याच्या विरोधात वाहनचोरीचे तीन गुन्हे यापूर्वी दाखल आहेत. दोन अल्पवयीन मुलांवर वाहनचोरीचे प्रत्येकी १९ गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट चारचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रसाद गोकुळे, सहायक निरीक्षक अंबरिष देशमुख, सिद्धनाथ बाबर यांच्या पथकाने केली.