- चोरीच्या २४ दुचाकी जप्त; भोसरी पोलिसांची कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४. जून. २०२१) :- मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरून त्याची विक्री करणाऱ्या संगणक अभियंत्यासह चौघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून चोरीच्या २४ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. एमआयडीसी भोसरी पोलिसांनी ही कामगिरी केली.
आकाश केदारनाथ बधे (वय २२, रा. आदर्शनगर, मोशी), विलास बाळशिराम मोरे (वय ३५, रा. मोशी), अक्षय अभिमान जाधव (वय २१, रा. एमआयडीसी भोसरी) आणि ऋषिकेश शांताराम पिंगळे (वय २१, रा. नारोडी, आंबेगाव) यांना अटक करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आकाश बधे हा संगणक अभियंता आहे. आरोपी पिंपरी- चिंचवड परिसरातून दुचाकी चोरी करीत होते. याबाबत पोलीस कर्मचारी विजय दौंडकर यांना माहिती मिळाली. त्यानुसार, एमआयडीसी भोसरी पोलिसांनी सापळा रचून आरोपीना अटक केली. पोलिसांनी आरोपीला विश्वासात घऊन चौकशी केली असता त्यांनी एमआयडीसी भोसरी, चिखली, निगडी, दिघी, मंचर आदी ठिकाणाहून तब्बल २४ दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार आरोपींनी विकलेल्या सोळा लाख रुपये किंमतीच्या २४ दुचाकी जप्त केल्या. आरोपींनी या कागदपत्र आणून देण्याच्या बोलीवर कमी किमतीला या दुचाकींची विक्री केल्याचे तपासात समोर आले आहे.