- ३२ प्रभागांसाठी ३२ समित्या..
- नगरसेवकांसह पाच ते दहा जणांचा समावेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४. जून. २०२१) :- कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी महापालिकेने वॉर्ड स्तरावर मायक्रो नियोजन केले आहे. वॉर्ड स्तरावर संस्थात्मक विलगीकरण कक्ष, कोरोना टेस्टिंग सेंटर, फिव्हर क्लिनिक, क्षेत्रीय स्तरावर सुसज्ज वॉर रूम उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती महापौर उषा ढोरे यांनी दिली.
पिंपरी – चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील कोरोना विषाणूचा प्रतिबंध करून, वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी महापालिका स्तरावर उपाययोजना करण्यात येत आहेत. दोन लाटांचा पूर्वानुभव विचारात घेता यापुढील नजीकच्या काळात तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात
घेऊन उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयांतर्गत असलेल्या वॉर्डामध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण ४ कोविड दक्षता समित्या स्थापन होतील.
कोविड दक्षता समितीमध्ये १ स्थानिक नगरसदस्य, क्षेत्रीय अधिकारी, संबंधित रुग्णालय प्रमुख किंवा वैद्यकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ता, त्या भागातील व्यापारी संघटनेचा प्रतिनिधी यांचा समावेश राहील. समितीमध्ये किमान ०५ व कमाल १० सदस्य असतील. याप्रमाणे ३२ प्रभागाकरिता ३२ कोविड दक्षता समित्या स्थापन केल्या जातील. क्षेत्रीय स्तरावर वॉर रुम निर्माण करुन समित्यांचे संचालन, क्षेत्रीय अधिकारी स्तरावर करण्यात येईल.
महापालिकेच्या प्रत्येक वॉर्डमध्ये व मोठ्या निवासी सोसायट्यांचे क्लब हाऊस. इतर हॉलमध्ये वॉर्ड कोविड सेंटर उभारले जाणार आहे. ३२ वॉर्डमध्ये स्वतंत्रपणे प्रत्येकी याप्रमाणे ३२ वॉर्ड कोविड सेंटर सुरु होतील. वॉर्ड कोविड सेंटरमध्ये किमान ५० बेडची व्यवस्था राहील. तिथे संशयित रुग्णांची तपासणी करण्यात येईल. शहरातील सर्व मोठ्या निवासी सोसायट्यांमध्ये क्लबहाऊसमध्ये इतर हॉलमध्ये विलगीकरण केंद्र निर्माण करण्यात येणार आहे.
कोविडबाधित रुग्णांना गृह विलगीकरण न करता सर्व रुग्णांना संस्थात्मक विलगीकरण करण्यावर भर दिला जाईल. वॉर्डस्तरीय स्थापन केलेल्या ३२ वॉर्ड कोविड सेंटरमध्ये दाखल करणे, रुग्णाने स्वेच्छेने खासगी हॉस्पिटलशी संलग्न असलेल्या हॉटेलमधील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल होणेस अनुमती मागितल्यास परवानगी देणे, असे पर्याय उपलब्ध असणार आहे. सर्व रुग्णालये व दवाखाने यांनी संशयित रुग्णांची व कोविड बाधित रुग्णाची माहिती पालिकेला द्यावी.

















