- भाजपाला टार्गेट करण्यासाठी सोयीच्या मुद्द्यांची केली जाते निवड..
- सत्ताधा-यांना वाचवण्यासाठी आपल्याच नेत्यांचे पाय खेचण्याचा प्रयत्न…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६. जून. २०२१) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेत केवळ २६ लाखांच्या विठ्ठल मुर्ती खरेदीच्या कथीत घोटाळ्याचा डिंडोरा पीटून राष्ट्रवादीतून भाजपात डंप झालेल्या सत्तापीपासू कार्यकर्त्यांनी २०१७ च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला पाच वर्षे घरी बसवले. सत्ताधारी भाजपाचे पाच वर्षे संपत आले असताना आगामी निवडणुकीला अवघे सात महिने शिल्लक राहिले आहेत. गेल्या साडेचार वर्षात भाजपाने कोणती चुकीची कामे केली हे सांगण्यात राष्ट्रवादीचे विद्यमान पदाधिकारी कमी पडत आहेत. आपल्याच ज्येष्ठ नेत्यांनी अभ्यासपूर्वक काढलेल्या मुद्यांचा आधार घेत भाजपाला खिंडीत पकडत असल्याचा केविलवाना देखावा हे पदाधिकारी करत आहेत. सत्ताधा-यांच्या चुकीच्या कामांवर बोट ठेवण्याची धमक नसलेले तकलादू पदाधिकारी स्वपक्षीय नेत्यांचे पाय ओढण्यात गुंतले आहेत. पदे टिकवण्यासाठी पक्षांतर्गत सुरू झालेल्या घाणेरड्या राजकारणामुळे आगामी पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी भाजपाला सत्तेपासून कशी रोखणार, असा सवाल उपस्थित झाला आहे.
गेल्या पाच वर्षात भाजपाने पुण्यकर्म केले असून असे एकही चुकीचे काम केले नसल्याची पावतीच राष्ट्रवादीच्या विद्यमान पदाधिका-यांकडून सत्ताधा-यांना दिली जात आहे. आगामी निवडणुकीला अवघे सात महिने शिल्लक राहिले आहेत. एवढ्या कमी काळात सत्ताधारी पक्षाला पालिकेतून हाकलून लावण्याचा एकही कार्यक्रम राष्ट्रवादीच्या विद्यमान पदाधिका-यांकडे फाईलबंद नाही. पक्षसंघटण वाढीसाठी प्रयत्न केले जात नाहीत. बुथ कमिट्यांची पुनर्बांधणी केली जात नाही. कार्यकर्त्यांचे मेळावे घेतले जात नाहीत. कोरोना काळ असला तरी कार्यकर्त्यांच्या ऑनलाईन बैठका घेतल्या जात नाहीत. पालिकेत सत्ता असून भाजप कार्यकर्त्यांनी मार्च २०२० पासून कार्यकर्त्यांच्या सुमारे १० ऑनलाईन बैठका घेतल्या आहेत. परंतु, राष्ट्रवादीच्या विद्यमान पदाधिका-यांनी गेल्या वर्षभरात एकही बैठक घेतलेली नाही. कार्यकर्त्यांशी संवाद साधून आगामी निवडणुकीला सामोरे जाण्याच्या सूचना दिल्या नाहीत. दिवंगत विरोधी पक्षनेते दत्ता काका साने यांचा कार्यकाळ संपल्यानंतर राष्ट्रवादीतील चैतन्य हरपून गेले आहे. ते पुन्हा प्रफुल्लीत करण्यासाठी एकाही विद्यमान पदाधिका-याने प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी कोणत्या दिशेने मार्गक्रमण करत आहे, हेच कळत नसल्याच्या तक्रारी कार्यकर्ते करत आहेत.
कोरोना काळात बेड उपलब्ध नाहीत, रेमडेसिवीरचा तुटवडा, एचए कंपनीला लस निर्मितीची परवानगी द्यावी, ऑक्सिजन प्लान्ट उभे करावेत, पाणी पुरवठा करावा असे तेच ते मुद्दे उपस्थित करून राष्ट्रवादीचे पदाधिकारी भाजपाकडे मागणी करताना दिसत आहेत. आता तीन हजाराचे अनुदान देण्याचा फसलेला मुद्दा चर्चेचा विषय ठरत आहे. याच मुद्यांवर पुन्हा पुन्हा पदाधिका-यांकडून निवेदने काढली जात आहेत. एखाद्या नेत्याने एक मुद्दा उपस्थित केल्यानंतर पुन्हा तोच मुद्दा उपस्थित करण्याचा कित्ता गिरवला जात आहे. पक्षाचा एखादा व्यक्ती प्रामाणिकपणे विषयानुरूप अभ्यासपूर्ण माहिती घेऊन भाजपाच्या विरोधात लढा देत असेल तर त्याचे पाय ओढण्याचे काम हे पदाधिकारी करू लागले आहेत.
दिवंगत दत्ता काका साने यांच्यानंतर माजी आमदार विलास लांडे यांचे काम उल्लेखनिय आहे. लांडे यांच्या सेकंड फळीतील विद्यमान पदाधिकारी पक्षाला न्याय देताना दिसत नाहीत. भाजपाच्या चुकीच्या कामांवर बोट ठेवून त्यांना रोखण्याची धमक दाखविली जात नाही. त्यामुळे अशा पदाधिका-यांकडून पालिकेत सत्ता आणण्याचे स्वप्न पाहणे म्हणजे निव्वळ हास्यास्पद ठरेल, अशी भावना कार्यकर्ते व्यक्त करू लागले आहेत.
भोसरीतील भाजपाच्या नगरसेवकाला प्राधिकरण जमीन विक्री प्रकरणात अटक झाल्यानंतर त्यांच्या सोशल मीडियाच्या टिमने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टिकाटिपण्णी सुरू केली. अजितदादा हातात टिकाव घेऊन पाण्याची टाकी फोडत असल्याचे कार्टून बनवून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. अजित पवार हेच भोसरीकरांच्या मुळावर उठल्याचे चित्र नागरिकांच्या समोर उभे करण्यात आले. राष्ट्रवादीचे विद्यमन पदाधिकारी हा सर्व प्रकार उघड्या डोळ्यानी पाहत बसले. परंतु, हे सर्व करत असलेल्या सोशल मीडियावरील समाजकंटकांच्या विरोधात तक्रार अथवा एक शब्द देखील बोलण्याचे धारिष्ट्य या पदाधिका-यांनी दाखवले नाही. कारण, विद्यमान पदाधिका-यांचे हात दगडाखाली अडकल्यामुळे भाजपाच्या ताटाखालचे मांजर होऊन राहण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. शेवटी माजी आमदार लांडे यांनीच कडव्या भाषेत भाजपातील कुरापतखोरांना खडेबोल सुनावले. त्यांच्या आरोपाला घाबरून भाजपाच्या कुटील फेसबुक टिमने दादांच्या विरोधातील कुरापती त्वरीत थांबवल्या.
लांडे यांच्या भूमिकेनंतर शहनपण सुचलेल्या विद्यमान पदाधिका-यांनी हा प्रकार घडून दोन दिवस उलटल्यानंतर रात्री उशीरा पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे तक्रार दिली. लांडे यांनी दादांविरोधात सुरू झालेले सोशल वॉर पलटवून लावले नसते तर या विद्यमान पदाधिका-यांनी तक्रार सुध्दा दिली नाही. उघड्या डोळ्यांनी हा प्रकार पाहून पदाधिका-यांनी याकडे दुर्लक्ष केले असते. दादांची बदनामी पुढे होतच राहिली असती. परंतु, लांडे यांचे पवार घराण्याशी असलेले घनिष्ट संबंध यामुळे असे प्रकार होताना लांडे शांत बसणार नाहीत, याची खात्री शहरातील कोणत्याही भागातला कार्यकर्ता देऊ शकेल. परंतु, हे विद्यमान पदाधिकारी स्वतःची जबाबदारी धुडकावून चमडी बचाऊ राजकारण करू लागले आहेत. स्वतःमधील निष्क्रियता चव्हाट्यावर येऊ नये म्हणून काम करणा-या प्रामाणिक कार्यकर्त्याचे पाय ओढण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांची फळी पूर्णपणे ढासळली आहे. याचा परिणाम आगामी पालिका निवडणुकीवर होणार आहे, असा धक्कादायक अंदाज जाणकार नागरिकांनी व्यक्त केला आहे.
















