- विकसित, सार्वजनिक व अतिक्रमित भाग पालिकेकडे..
- अन्यायकारक निर्णयामुळे पिंपरी चिंचवडकरांचे मोठे नुकसान – आ. महेश लांडगे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ जून २०२१) :- पिंपरी – चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण बरखास्तीचा अध्यादेश सोमवारी जारी करण्यात आला. प्राधिकरणाच्या मालमत्ता, निधी आणि देय रकमा पीएमआरडीएकडे गेल्या आहेत. विकसित झालेला भाडेपट्ट्याने दिलेले भूखंड, सार्वजनिक सुविधांसाठीचे भूखंड आणि अतिक्रमण झालेल्या भूखंडाचा ताबा महापालिकेकडे दिला आहे. प्राधिकरणाच्या सर्व ताबा क्षेत्रासाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून काम पाहणार आहे.
पिंपरी – चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण ५० वर्षांनंतर विसर्जित झाले. त्याचे पीएमआरडीएत आणि महापालिकेत विलीनीकरण केले आहे. त्याची अधिसूचना सोमवारी प्रसिद्ध झाली. विलीनीकरणामुळे प्राधिकरणाच्या सर्व चल, अचल मालमत्ता आणि दायित्वे राज्य सरकारमार्फत नगर विकास विभागाच्या अखत्यारीत येणार आहेत.
महापालिका हद्दीतील पीसीएनटीडीएने भाडेपट्ट्याने दिलेले आणि विकसित झालेले भूखंड, सार्वजनिक सुविधांच्या आरक्षणाखालील भूखंड आणि ज्यावर अतिक्रमण झालेले आहे, असे भूखंड यांची मालकी व ताबा महापालिकेकडे सुपूर्द केला आहे.
चिंचवड येथे सरकारी विश्रामगृहाकरिता सुमारे अडीच एकर क्षेत्राचा भूखंड एक रुपये नाममात्र दरात सरकारकडे हस्तांतरित केला जाणार आहे. पीसीएनटीडीए क्षेत्रातील पेठ क्रमांक ५ मध्ये पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व परिषद केंद्र, पेठ क्रमांक ९,११,१२ आणि भोसरी मध्यवर्ती सुविधा केंद्र यांचे एकूण क्षेत्र ३७५.८९ हेक्टर आहे. यापैकी विविध प्रयोजनाच्या वाटपास, विकासास उपलब्ध क्षेत्र २२३.८९ हेक्टर क्षेत्र एकसंध आहे. याची जबाबदारी पीएमआरडीएकडे असणार आहे.
पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अस्तित्व संपुष्टात आले असून, त्याबद्दलचे नोटिफिकेशन राज्य सरकारने जारी केले. सदर निर्णयाला लोकप्रतिनिधी या नात्याने पहिल्याच दिवशी विरोध केला होता. तसेच मुख्यमंत्री व सर्व संबंधित मंत्री महोदय यांना पत्रव्यवहार केला होता. खासदार-आमदार हे लोकप्रतिनिधी जनतेने मोठ्या विश्वासाने निवडणून दिलेले असतात, राज्य सरकारने सदर निर्णय घेताना तसेच नियमावली जाहीर करताना लोकप्रतिनिधिंना विश्वासात घेणे गरजेचे होते. या अन्यायकारक निर्णयामुळे पिंपरी चिंचवडकरांचे खूप मोठे भरुन न येणारे नुकसान होणार आहे.
– आमदार महेश लांडगे…