- बंधन घातल्यास बाजारपेठ बंद करण्याचा फेडरेशनचा इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३. जून. २०२१) :- पिंपरी चिंचवड पालिका प्रशासन लवकरच पिंपरी कॅम्पमध्ये पी-१, पी-२ प्रमाणे दुकाने उघडी ठेवण्याचे बंधन घालणार आहे. यास पिंपरीतील सर्व व्यापा-यांचा तीव्र विरोध आहे. असे झाल्यास पिंपरीतील सर्व व्यापारी व्यापार बंद ठेवून मोर्चा काढून महानगरपालिकेच्या प्रवेशव्दारासमोर ठिय्या आंदोलन करतील, असा इशारा फेरडेशच्या वतीने देण्यात आला आहे.
सुरु असणा-या लॉकडाऊनमध्ये सोमवार ते शुक्रवार पर्यंत सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवावी लागतात. शनिवारी व रविवारी पुर्ण दिवस दुकाने बंद ठेवावी लागतात. पी-१, पी-२ मुळे आठवड्यातून दोनच दिवस दुकाने सुरु ठेवावी लागतील. यातून कामगारांचे पगार देखील वसूल होणे अवघड आहे.
व्यापा-यांना वीजबील व मिळकत करात आणि जीएसटीमध्ये सवलत मिळावी ही मागणी प्रलंबित असताना तसेच ग्राहकांची क्रयशक्ती कमी झालेली असताना व्यापा-यांवर बंधन घालणे अन्यायकारक आहे, यास पिंपरी मर्चंन्ट फेडरेशनचा तीव्र विरोध असल्याचे पत्रक पिंपरी मर्चंन्ट फेडरेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवाणी यांनी प्रसिध्दीस दिले आहे.


















