- संबंधितांवर चिखली व रावेत पोलीस चौकीत गुन्हे दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५. जून २०२१) :- पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने चिखली परिसरात अवैध दारू विक्री प्रकरणी तर रावेत परिसरात हुक्का पार्लरवर कारवाई केली. चिखली पोलीस स्टेशन हद्दीत गणेशनगर तळवडे येथे तळवडे निगडी रस्त्यावरील रोडच्या डाव्या बाजुच्या कॉर्नर हॉटेलमध्ये विनापरवाना अवैधरित्या देशी विदेशी दारुच्या बाटल्या ताब्यात बाळगून त्याची विक्री होत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी शनिवारी (दि. १२) कारवाई केली. या कारवाईत १७ हजार ३४८ रुपये किमतीच्या देशी विदेशी दारूच्या बाटल्या, चार हजार २१० रुपये रोख रक्कम असा २१ हजार ५५८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सचिन सिध्दप्पा शेट्टी (वय ३५, रा. तळवडे, पुणे) याच्या विरोधात चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत.
रविवारी (दि.१३) सामाजिक सुरक्षा पोलिसांना माहिती मिळाली की, गुनाजी व्हेज नॉनव्हेज ढाबा तसेच नर्मदा व्हेज नॉनव्हेज ढाबा, भोंडवे कॉर्नर रॉयल कासा सोसायटी समोर, रावेत येथे विनापरवाना अवैधरित्या आर्थिक फायद्यासाठी विदेशी दारुच्या बाटल्या तसेच हुका पिण्यासाठी लागणारे साहित्य उपलब्ध करुन दिले. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून कारवाई केली. त्यात १८ हजार ८८० रुपये रक्कम, १९ हजार ५५० रुपयांचे हुक्का पिण्याचे साहित्य, एक हजार ६०० रुपयांच्या विदेशी दारूच्या बाटल्या असा ४० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सुरेश शंकर विश्वकर्मा (वय २१, रा. गुनाजी ढाबा व्हेज नॉनव्हेज, रावेत कॉर्नर, मुळ रा. साफेबनगर, पोस्ट गोयलपाणी जि आच्छाम, नेपाळ), अश्विन रमेश राठोड (वय २७, रा. शिंदेवस्ती, रावेत) व इतर तीन जणांच्या विरोधात रावेत पोलीस चौकी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरील दोन्ही कारवयांमध्ये एकूण ६१ हजार ५८८ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
















