- विदेशातील संग्रहालयांत असणाऱ्या या चित्रांचा प्रसाद तारेंनी लावला शोध…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५. जून २०२१) :- परदेशातील संग्रहालयांमध्ये असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची तीन समकालीन चित्रे पुण्यातील इतिहास संशोधक प्रसाद तारे यांनी प्रकाशात आणली आहेत.
दख्खनी गोवळकोंडा चित्रशैलीतील ही चित्रे १७ व्या शतकातील असून ती लघुचित्रे (मिनीएचर पेंटिंग) स्वरूपात आहेत. भारतामध्ये आलेल्या तत्कालीन युरोपीयन व्यापाऱ्यांमार्फत प्रथम ही लघुचित्रे युरोपमध्ये हस्तांतरित झाली. जर्मनी, फ्रान्स आणि अमेरिका येथे ही चित्रे सुरक्षितपणे जतन करण्यात आली आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांची जगभरात २७ चित्रे प्रसिद्ध आहेत. या तीन अप्रकाशित चित्रांची भर पडण्यासाठी तारे यांनी केलेले प्रयत्न स्तुत्य आहेत. परदेशात असलेली ही चित्रे मराठी माणसांसाठी अभिमानास्पद आहेत, असे पांडुरंग बलकवडे यांनी सांगितले. मुंबई येथील छत्रपती शिवाजी संग्रहालय येथील चित्रांशी ही मिळतीजुळती चित्रे आहेत, असे निरीक्षण त्यांनी नोंदविले.


















