- आरटीओकडून ऑनलाइन लर्निंग लायसन्स देण्याची सुविधा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५. जून २०२१) :- शासनाच्या परिवहन विभागाने ऑनलाइन लर्निंग लायसन्स देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून आता लर्निंग लायसन्स काढणे अगदी सुलभ होणार आहे. नागरिकांना घरबसल्या लर्निग लायसन्सची चाचणी देता येणार आहे. त्यामुळे अशा उमेदवारांना आरटीओ कार्यालयात जाण्याची गरज पडणार नाही.
सोमवारी पूर्ण क्षमतेने ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. पहिल्याच दिवशी सोमवारी (दि.१४) दोन जणानी ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करून पिंपरी- चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून ऑनलाइन लर्निंग लायसन्स मिळवले आहे. ही सेवा फक्त दुचाकी व चारचाकी खासगी वाहनांसबंधी असणार आहे. प्रक्रियेमुळे नागरिकांचा वेळ वाचणार आहे. तसेच या दोन्ही सेवांचा लाभ अर्जदाराला घरबसल्या घेता येणार आहे. या संदर्भातील मार्गदर्शक सूचना प्रादेशिक परिवहन विभागाला प्राप्त झालेल्या आहेत.
संकेतस्थळावर जाऊन सारथी हे ऑपरेशन सिलेक्ट करावे. त्यामध्ये आधार कार्डचा नंबर टाकल्यानंतर विचारलेली माहिती भरावयाची आहे त्यानंतर त्यात रस्ता सुरक्षाविषयक व्हिडिओ दिसेल. त्यावर आधारित ६० प्रश्न विचारले जातील. वाहनांच्या नोंदणीकरिता मोटार वाहननिरीक्षकांमार्फत यापुढे वाहन तपासणीची आवश्यकता असणार नाही; तथापि आकर्षक क्रमांकाचे बुकिंग केलेल्यांसाठी नियम ५४ प्रमाणे कार्यवाही करण्यात येणार आहे. वाहन अधिकृत विक्रेत्याने शुल्क भरल्यानंतर नोंदणी क्रमांक आपोआप जारी होणार आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी दिली.
















