- पिंपरी चिंचवडमधील आशा सेविकांचा बेमुदत संपाचा यल्गार..!
- राज्यभरात ७० हजार आशा सेविकांचे आजपासून काम बंद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५. जून २०२१) :- गेले वर्षभर करोना काळात करोना रुग्णांसाठी काम करून घेऊन राज्य सरकारने आम्हाला फुटकी कवडीही दिली नाही. त्यामुळे आता बेमुदत संपातून माघार नाही असा संताप पिंपरी चिंचवड व राज्यभरातील आशा कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
जवळपास ७० हजार आशांनी आजपासून राज्यव्यापी संप पुकारला असून याचे गंभीर परिणाम ग्रामीण भागातील करोनाच्या कामावर होऊ शकतात असे आरोग्य विभागाच्या सूत्रांचे म्हणणे आहे. ‘आशां’ना संप करायला भाग पाडणारे सरकार करोनाच्या तिसऱ्या लाटेविषयी किती गंभीर आहे हेच यातून स्पष्ट होते असेही तिखट उद्गार आशा कार्यकर्त्यांनी काढले.
केंद्र व राज्य सरकारकडून एरवी आरोग्याच्या विविध कामांपोटी आशा कार्यकर्त्यांना चार हजार रुपये मानधन मिळते. मात्र गेले वर्षभर या ‘आशां’ना आरोग्य विभागाकडून करोनाच्या विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. यात घरोघरी जाऊन ताप, ऑक्सिजन पातळी मोजण्यासह सर्वेक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच लसीकरणाच्या कामाला मदत करण्यापासून प्राथमिक आरोग्य केंद्रांवर करोना रुग्णतपासणीच्या कामात सहकार्य करावे लागते. केंद्र सरकारने यासाठी महिन्याला एक हजार रुपये प्रोत्साहन भत्ता जाहीर केला आहे. याचाच अर्थ रोजचे ३५ रुपये आठ तासाच्या कामासाठी आम्हाला दिले जातात, असे आशा लोखंडे या आशा कार्यकर्तीने सांगितले.
गेले वर्षभर करोनाचे काम आमच्याकडून करून घेणाऱ्या राज्य सरकारने अजूनपर्यंत फुटकी कवडीही आम्हाला दिली तर नाहीच उलट आरोग्य विभागाच्या अन्य कामांसाठी मिळणारे अडीच तीन हजार रुपयेही देणे बंद केल्याचे लोखंडे यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ योजना केवळ आशांमुळेच यशस्वी झाली, तेव्हाही आरोग्य विभागाने कामाचे ठरलेले पैसे देण्यास खळखळ केली होती. करोनाच्या कामासाठी डॉक्टरांपासून परिचारिकांपर्यंत सर्वांना हे सरकार हवे तेवढे पैसे देते आणि ग्रामीण आरोग्याचा कणा असलेल्या ‘आशां’ना वेठबिगार म्हणून राबवून घेते हे आता आम्ही सहन करणार नाही, असेही संपावरील आशांनी सांगितले.
















