- अशक्तपणा व इतर आजारांवर उपचार मिळणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जून २०२१) :- कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्यानंतरही काही जणांना अशक्तपणा, फुप्फुसाची कार्यक्षमता कमी होऊन दम लागतो. त्यांची शारीरिक क्षमता व दैनंदिन जीवनशैली सुधारावी यासाठी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात कोरोना रुग्ण पुनर्वसन केंद्र (पोस्ट कोविड रिहबिलिटेशन सेंटर) सुरू करण्यात आले आहे.
कोरोनातून बरे झालेले पण कार्यक्षमता कमी झालेल्या रुग्णांना भौतिकोपचार तज्ज्ञ (फिजिओथेरपिस्ट) उपकरणांच्या साहाय्याने व्यायाम शिकवतात. रुग्ण सुधारावा यासाठी सातत्याने दखल घेतली जाते. केंद्रामध्ये आवश्यक अद्ययावत उपकरणे उपलब्ध करण्यासाठी महापालिका व सिप्ला फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे.
पालिकेने तज्ज्ञ फिजिओथेरपिस्टची नेमणूक केली आहे. हे केंद्र मंगळवार (दि.१५) पासून कार्यान्वित झाले. त्यासाठी वायसीएमचे अधिष्ठाता डॉ राजेश वाबळे, सिप्ला फाउंडेशनचे अनुराग मिश्रा, डॉ क्रांती रायमाने आणि डॉक्टरांचे सहकार्य लाभले. फिजिओथेरपिस्ट रुग्णांना ओपीडीच्या वेळेत तळ मजल्यावरील फिजिओथेरपी विभागात उपचारासह व्यायाम प्रकार शिकविणार आहेत. तसेच, अशक्तपणा व इतर आजारांवर उपचार केले जातील असे वायसीएमचे प्रवक्ता डॉ. यशवंत इंगळे यांनी सांगितले.