- पु. ल., गदिमा, बाबूजी हे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे पाईक
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जाने.) :- पिंपरी चिंचवड महापालिकेने महाराष्ट्राचे महान साहित्यिक व सुपुत्र कै. ग. दि. माडगुळकर, कै. सुधीर फडके आणि कै. पु. ल. देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करावे, याकरीता चिंचवड ब्लॉक काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष व स्व. राजीव गांधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदेशकुमार नवले यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे.
या निवेदनात नवले म्हणाले की, या महान साहित्यिकांचे राज्यात व राज्यातील महापालिकांमध्ये जन्मशताब्दी महोत्सव भरविण्यात आलेले आहेत. दोन महिने होऊन गेले तरी, अद्याप पिंपरी चिंचवड महापालिकेने या महान सुपुत्रांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्यासाठी कोणतेही पाउल उचलले नाही. देशाला आणि राज्याला साहित्य-सुरांचे समृद्ध योगदान लाभलेले आहे. महाराष्ट्राला लाभलेल्या देदीप्यमान सांस्कृतिक संचीतातली गदिमा, पूल आणि सुधीर फडके ही अत्यंत मौल्यवान रत्ने आहेत. या तिघांचाही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सार्वजनिक क्षेत्रामध्ये अविस्मरणीय असा मोलाचा सहभाग आहे.
संगीत आणि गायनामध्ये सुधीर फडके उर्फ बाबुजींनी रसिकांना मोहिनी घातली होती. पु. ल. देशपांडे हे साहित्यिक, नाटककार, संगीतकार, दिग्दर्शक, अभिनेता अशा विविधांगी व्यक्तिमत्वाने खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व बनले होते. साहित्याच्या क्षेत्रात ग. दि. माडगुळकरांचे योगदान हे अत्यंत प्रभावीपणे कविता, कथा, कादंबरीतून आणि विशेषतः गीतांमधून अजरामर झालेले आहे. या तिन्ही जेष्ठ महान कलाकारांच्या नातेवाईकांचा यथोचित सन्मान करावा. तसेच पु. ल., गदिमा, बाबूजी हे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे पाईक आहेत. त्यांच्या अलौकिक कर्तुत्वाला पिंपरी चिंचवड महापालिकेचा मनाचा मुजरा मिळालाच पाहिजे, यासाठी महापालिकेने संगीत महोत्सव जन्मशताब्दी वर्ष साजरी करण्याचे आवाहन, नवले यांनी निवेदनाच्या माध्यमातून केले आहे.











