न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मोशी (दि. २ जाने.) :- मोशी-प्राधिकरण येथील गॅलक्सी किड्स प्री. प्रायमरी स्कूलमध्ये नवीन वर्षाचे स्वागत अनोख्या पद्धतीने करण्यात आले. समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. याचे भान जपत नववर्षाच्या निमित्ताने गॅलक्सी किड्स प्री. प्रायमरी स्कूलच्या चिमुकल्यांनी चिंचवड येथील नचिकेत बालग्रामच्या मातृसेवा विद्या मंदिरास भेट दिली व शाळेतील मुलांना शालेय वस्तूंचे मोफत वाटप केले.
यावेळी नचिकेत बालग्रामच्या व्यवस्थापिका सौ. नवले, गॅलक्सी किड्स प्री. प्रायमरी स्कूलच्या संस्थापिका व राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघाच्या पिंपरी चिंचवड महिला सचिव माधवी जनार्धनन, विद्यार्थी व शाळेतील शिक्षक व शिक्षिका आदी उपस्थित होते.
गॅलक्सी स्कूलच्या संस्थापिका माधवी यांनी शाळेच्या वतीने बालग्रामच्या विद्यार्थ्यांकरीता मोफत ‘अबॅकस वर्ग’ घेण्याचा मनोदय व्यक्त केला. यावेळी नवले यांनी संस्थेच्या वतीने गॅलक्सी स्कूलचे आभार मानले.