- बळजबरीने खिशातील रोकड हिसकावत मोबाईलचीही तोडफोड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३. जून. २०२१) :- फिर्यादी दुचाकीवरून जात असताना त्यांनी त्यांच्या दुचाकीचा हॉर्न वाजविला. यामुळे आरोपींनी त्यांच्या गाडीला लाथ मारून खाली पाडले. आरोपी विकी मल याने फिर्यादीच्या डोक्यात बाटली मारून जखमी केले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीच्या खिशातील सहा हजार २०० रुपयांची रोकड व इतर कागदपत्र जबरदस्तीने काढून घेतली. तसेच मोबाइल रस्त्यावर आपटून नुकसान केले.
आरोपी ढवळे याने फिर्यादीच्या गाडीची चावी जबरदस्तीने काढून घेतली. फिर्यादीने बचावासाठी आरडा ओरडा केला असता काही नागरिक मदतीसाठी आले. मात्र त्यावेळी आरोपी विकी मल याने हातातील बाटली उंचावून मोठमोठ्याने ओरडून जीवे मारण्याची धमकी दिली. थेरगाव येथे ४ जून रोजी रात्री बाराच्या सुमारास ही घटना घडली.
मयुर प्रकाश गिरी (वय २१, रा. काळाखडक, वाकड), असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांनी सोमवारी (दि. २१) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अक्षय चिमाजी ढवळे (वय २३, रा. कैलासनगर, थेरगाव), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह विकी मल आणि आकाश (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधातही गुन्हा दाखल केला आहे. सहायक निरीक्षक संभाजी जाधव तपास करीत आहेत.


















