- हजार रुपये निश्चित मानधन व पाचशे रुपयांवर केली बोळवण..
- आरोग्यमंत्री टोपे व कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून संप मिटल्याची घोषणा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जून २०२१) :- राज्यातील आशा वर्कर्सचा संप अखेर मिटला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज पुन्हा आशा संपाबाबत कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.
यावेळी आशांना १ जुलै २०२१ पासून १००० रुपये निश्चित मानधन वाढ आणि ५०० रुपये कोविड भत्ता देण्याचा निर्णय झाला. आरोग्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत तोडगा निघाल्याने संप मागे घेत असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी या बैठकीनंतर जाहीर केले. राज्यातील ७२ हजारांहून अधिक आशा वर्कर्स कामावर न जाता घरी बसून हा संप करत होत्या. दरम्यान, राज्यभरातील आशा वर्कर्सनी पुकारलेल्या संपावर तोडगा काढण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून आशा वर्कर्स संघटनेचे पदाधिकारी आणि आरोग्यमंत्र्यांमध्ये चर्चा सुरु होत्या.
आशा वर्कर्सचा संप पुकारल्यापासून आशा वर्कर्स संघटनेचे पदाधिकारी आणि आरोग्यमंत्र्यांमध्ये तीन बैठका झाल्या. अखेर एक जुलैपासून निश्चित मानधनात वाढ करुन एक हजार रुपये केलं जाणार असल्याची हमी आशा वर्कर्सना देण्यात आल्यामुळे त्यांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.


















