- नागरिकांच्या मानसिक अडचणी होणार दूर; पालिकेचा उपक्रम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जून २०२१) :- कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत नागरिकांच्या मनात भीतीचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ती भीती दूर करण्यासाठी ‘ हॅलो पिंपरी चिंचवड.. एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह ‘ हा उपक्रम पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत आहे. नागरिकांच्या मनात कोरोनाविषयी असलेली मानसिक समस्या दूर करण्यासाठी शिवप्रसाद महाले हे नागरिकांसोबत दररोज वेबिनारद्वारे संवाद साधणार आहेत, अशी माहिती महापौर उषा ढोरेव पक्षनेते नामदेव ढाके यांनी सोमवारी (दि.२३) दिली.
महाले यांनी पालिकेच्या वायसीएम रुग्णालय, ऑटो क्लस्टर व जम्बो रुग्णालयात ‘ रिचार्ज टु डिस्चार्ज ‘ उपक्रम राबविला होता. त्या उपक्रमातून बऱ्याच रुग्णांना दिलासा मिळाला. त्याच धर्तीवर शहरातील नागरिकांच्या मानसिक अडचणी दूर करणे, त्यांचे मनोधैर्य वाढविणे, काळजी घेण्याच्या हेतूने पालिकेच्या माध्यमातून हा उपक्रम राबविणार येत आहे.
उपक्रमाच्या माध्यमातून लोकांच्या मनात सध्याच्या वातावरणामुळे निर्माण झालेली भीती, मानसिक ताणतणाव दूर होण्यास मदत होणार आहे. पालिकेच्या वॉर रूममधील कॉल सेंटरच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. हेल्पलाईनच्या ८८८८००६६६६ या क्रमांकावर दररोज येणाऱ्या नागरिकांच्या फोन कॉलवरून समस्यांविषयी माहिती घेऊन त्या माहितीचा संक्षिप्त आढावा घेण्यात येणार आहे. त्याद्वारे एक सेशन तयार करण्यात येईल. त्याच दिवशी रात्री आठला फोन कॉल करणाऱ्या नागरिकांशी वेबिनारद्वारे संवाद साधून त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात येईल. हा उपक्रम राबविणारी पिंपरी – चिंचवड ही पहिली व एकमेव पालिका आहे. त्यासाठी नागरिकांनी आपल्या मनात कोरोनाविषयी शंका हेल्पलाइनशी संपर्क साधून सोडवावी, असे आवाहन महापौर ढोरे यांनी केले आहे.


















