- वेतनवाढ स्थगित; शास्तीच्या कारवाईचाही इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जून २०२१) :- मुख्य आरोग्य निरीक्षकांची स्वाक्षरी झाल्यानंतर हजेरीपत्रात फेरफार करुन गैरहजर कर्मचाऱ्याची हजेरी लावल्याप्रकरणी आरोग्य निरीक्षकाची वेतनवाढ स्थगित करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी दिले आहेत.
सचिन गुलाबराव जाधव, असे वेतनवाढ स्थगित केलेल्या आरोग्य निरीक्षकाचे नाव आहे. जाधव आरोग्य निरीक्षक गट क दर्जाच्या पदावर कार्यरत आहेत. त्यांच्याकडे प्रभाक क्रमांक ९ मधील नेहरुनगर, मासुळकर कॉलनी, अजमेरा, खराळवाडी परिसरातील आरोग्य विषयक कामकाज करुन घेण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती.
हजेरीपत्रकावर मुख्य आरोग्य निरीक्षकांची स्वाक्षरी झाल्यानंतर सफाई कामगार राजेंद्र भोईट यांचे नाव हजेरीपत्रकात नमूद करुन २०१७-१८ मधील सर्व उपस्थिती दाखविली. त्यानंतर हे हजेरीपत्रक ‘ क ‘ क्षेत्रीय कार्यालयास मंजुरीसाठी सादर केले. कर्मचारी कामावर नसतानाही हजर असल्याचे दाखवून मुळ हजेरीपत्रकामध्ये फेरफार करुन स्वत:च्या आर्थिक लाभासाठी महापालिकेची फसवणूक केली. यापुढे कार्यालयीन गैरवर्तन केल्यास जबर शास्तीची कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.