- स्थायी समितीची मोहर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जून २०२१) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात स्थायी समितीची ऑनलाईन पध्दतीने सभा पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी अॅड. नितीन लांडगे होते.
वायसीएम रुग्णालयासह महापालिकेच्या इतर रुग्णालये व दवाखान्यामध्ये काम करणाऱ्या मानधनावरील वैद्यकीय अधिकारी, स्टाफनर्स, पॅरामेडिकल स्टाफ, प्रयोगशाळा चिकित्सक व महापालिका आस्थापनेवरील वैद्यकीय तांत्रिक संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्वतंत्र कोविड भत्ता देण्यास स्थायी समितीच्या बैठकीत नुकतीच मान्यता देण्यात आली.
कर्मचाऱ्यांना स्वतंत्र कोविड भत्ता अदा करण्यात यावा याबाबत वैद्यकीय विभागाने १९ मे रोजी प्रस्ताव सादर केला होता. त्याला यापूर्वीच मान्यता देण्यात आली आहे. त्यानंतर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयासह महापालिकेच्या इतर रुग्णालये दवाखान्यातील वैद्यकीय तांत्रित संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही स्वतंत्र कोविड भत्ता देण्यात येणार आहे. यासोबतच प्रजनन व बाल आरोग्य, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रम अंतर्गत मानधनावर कार्यरत असलेले शहर कार्यक्रम व्यवस्थापक , शहर लेखा व्यवस्थापक , लेखापालस लिपीक , ए.एन.एम , डेटाएल्ट्री ऑपरेटर , लेखापाल स्टाफनर्स , वरिष्ठ डॉटस प्लस व क्षयरोग एचआयव्ही पर्यवेक्षक , वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक , टीबी हेल्थ व्हिजीटर , पीपीएम कॉर्डिनेटर , फार्मासिस्ट , प्रयोगशाळा तज्ज , बालवाडी शिक्षिका व आशा स्वयंसेविका यांना १० हजार रुपये कोविड भत्ता देण्यात येणार आहे . तसेच मदतनीस व ड्रायव्हर यांना ५ हजार रुपये स्वतंत्र कोविड भत्ता देण्यास उपसुचनेद्वारे मंजुरी देण्यात आली आहे. वर्ग १ व २ यांना १५ हजार रुपये, वर्ग ३ साठी १० हजार रुपये व वर्ग ४ साठी ५ हजार रुपये स्वतंत्र कोविड भत्ता देण्यात येणार आहे. वर्ग १ ते ४ असे मिळून ११५६ अधिकारी व कर्मचारी आहेत. १ एप्रिल २०२१ ते ३० जून २०२१ या कालावधीतील हा स्वतंत्र कोविड भत्ता देण्यात येणार आहे.