- कोविड संख्येत घट; मात्र तिसऱ्या लाटेची भीती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जून २०२१) :- पिंपरी – चिंचवड शहरात कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याने महापालिकेसह खासगी रुणालयांतील बेड मोठ्या संख्येने रिकामे आहेत. त्यामुळे महापालिकेच्या नेहरूनगर येथील कोरोनाच्या जम्बो रुग्णालय बंद करण्यात येणार आहे. मात्र, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता तेथील २०० बेड सज्ज व कार्यान्वित ठेवले जाणार आहेत.
पहिल्या लाटेत पीएमआरडीएने सुरू केलेल्या ८०० बेडच्या क्षमतेचे जम्बो रुग्णालय रुग्ण संख्या घटल्याने बंद करण्यात आले होते. दुसऱ्या लाटेत ते रुग्णालय महापालिकेने ताब्यात घेतले. प्रथम २०० बेडची तयारी करण्यात आली आहे. रुग्णसंख्या वाढल्याने बेडची संख्या वाढविण्यात आली. सध्या शहरात दिवसाकाठी २०० ते २५० रुग्ण आढळत आहेत. तर, सक्रिय रुग्ण हजारांच्या आसपास आहेत. संसर्ग कमी झाल्याने जम्बो रुग्णालयात रुग्ण मोठ्या प्रमाणात घटले आहेत. ती संख्या एकेरीवर आली आहे. त्यामुळे एका दिवसाचा शटडॉऊन घेऊन रुग्णालयाचे अत्याधुनिकरण करण्यात आले आहे. रुग्णसंख्या घटत असली तरी, पालिका २०० बेडची तयारी कायम ठेवणार आहे. तिसऱ्या लाटेत तयारी म्हणून २०० बेड तयार ठेवले जाणार आहेत, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी सांगितले की, उपचार घेत असलेले रुग्ण कमी झाल्याने नेहरूनगरचे जम्बो रुग्णालय बंद करण्याचा निर्णय आयुक्त घेणार आहेत. मात्र, २०० बेडची सज्जता कायम ठेवली जाणार आहे.

















