- नगरसेवकांची संख्याही वाढणार?..
- पालिकेच्या नगरसेवकांकडून वार्ड पद्धतीचे स्वागत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५. जून. २०२१) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेची आगामी सार्वत्रिक निवडणूक मुंबई महापालिकेप्रमाणे एकसदस्यीय पद्धतीने होण्याची शक्यता आहे. त्यासाठी सध्याची ४ वॉर्ड मिळून बनलेल्या प्रभागाची रचना बदलून पुन्हा नव्याने वॉर्ड रचना करावी लागणार आहे, असे झाल्यास सन २००७ नंतर म्हणजे तब्बल १५ वर्षानंतर फेब्रुवारी २०२२ मध्ये एकसदस्य पद्धतीने निवडणुका होतील. त्यामुळे शहराला १२८ पेक्षा अधिक नगरसेवक मिळण्याची शक्यता आहे.
नवीन वॉर्ड रचनेबाबत विद्यमान नगरसेवकांसह इच्छुकांमध्ये उत्सुकता आहे. महाविकास आघाडीने राज्यातील सर्व स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका एकसदस्यीय पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत अंतिम घोषणा होणे बाकी आहे. त्यामुळे केवळ आठ महिन्यांवर येऊन ठेपलेल्या महापालिकेच्या निवडणुकीबाबत नगरसेवकांसह इच्छुकांना वेध लागले आहेत.
शहराची लोकसंख्या २७ लाखांच्या पुढे आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीची लोकसंख्या लक्षात घेऊन काही वॉर्ड त्या वर्गासाठी आरक्षित केले जातील. तसेच, महिलांसाठी वॉर्ड आरक्षित केले जातील. कोरोना संक्रमणामुळे सन २०२२ ची जणगाना पूर्ण न झाल्याने सन २०११ च्या जनगणनेच्या आधारे वॉर्डरचना केली जाणार असल्याचे सूत्रांनी विशेष सांगितले. निवडणूक विभागास पुन्हा नव्याने वॉर्डरचना करावी लागणार आहे. वॉर्ड कमी क्षेत्रफळाचे असणार आहेत. प्रभागाप्रमाणे भलेमोठे वॉर्ड सांभाळण्याच्या कसरतीतून नगरसेवकांची सुटका होणार आहे.
निवडणूक आयोगाकडून अद्याप सूचना नाहीत. सध्या मतदारयाद्या बनविण्याचे काम विधानसभा मतदारसंघनिहाय जिल्ह्याधिकारी कार्यालयामार्फत सुरु आहे. महापालिकेला मतदारयादीबाबत आक्षेप नाहीत. तसेच, प्रभागरचना बदलण्याबाबत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. पालिकेच्या निवडणूक विभागाकडून अद्याप त्यासंदर्भात कामकाज सुरू झालेले नाही, असे महापालिकेचे सहायक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांनी सांगितले.
















