- राष्ट्रीय हरित लवादाच्या सूचनांकडे पालिकेचे दुर्लक्ष…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५. जून. २०२१) :- राष्ट्रीय हरित लवादाने महापालिका प्रशासनाची कानउघाडणी करूनही पवना, मुळा आणि इंद्रायणी नदीपात्रात भराव टाकण्याचे काम सुरू आहे. यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस होणार असल्याचे वेधशाळेने जाहीर केले आहे. त्यामुळे यंदा पवना आणि मुळा नदीकाठावरील पिंपरी, सांगवीसह १५ भागांना धोका आहे.
पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या हद्दीतून मुळा नदी ११ किलोमीटर पवना नदी २५ किलोमीटर आणि इंद्रायणी नदी २० किलोमीटर वाहते. मुळा नदीचे शहरातून कमी पात्र वाहत असले, तरी मुळा नदीला दरवर्षी पूर येतो. त्यामुळे सांगवी भागातील नागरिकांना स्थलांतरित करावे लागते. पवना आणि मुळशी धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यास धरणातील पाणी नदीत सोडले जाते. धरणातून जादा पाणी सोडल्यास नदीकाठच्या वस्त्यांना पुराचा सामना करावा लागतो.
पवना आणि मुळा नदीचा काही भाग बुजविला आहे. त्यामुळे नदीपात्र अरुंद होत आहे. त्यामुळे पवना, मुळा नदीपात्रालगतच्या लोकवस्त्यांना यंदाही पुराचा धोका आहे. पवना नदीलगत १० ठिकाणी आणि मुळा नदी पात्रालगतच्या ५ ठिकाणांना धोका आहे.
पवना नदी : पिपरीतील संजय गांधी नगर, आंबेडकरनगर, सुभाष नगर, भाटनगर, माता रमाईनगर, बौद्धनगर, चिचवडमधील मोरया गोसावी परिसर, रहाटणी स्मशानभूमी, कासारवाडी, फुगेवाडी, पिंपळे गुरव, सांगवी.
मुळा नदी : वाकडमधील ममता नगर, कस्पटे वस्ती परिसर, सांगवी.
मुळा नदीकाठ :- मधुबन सोसायटी, संगमनगर, पवनावस्ती, पिपळे निलख, दापोडी, हॅरिस पुलाजवळ, बोपखेल, गणेशनगर परिसर.
















