- कागदपत्रांअभावी वंचित रिक्षा चालकांना पुन्हा अर्ज भरता येणार..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६. जून. २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात एकूण १९ हजार ७९३ परवानाधारक रिक्षाचालक असून, त्यापैकी १४ हजार ८७८ रिक्षाचालकांनी राज्य सरकारच्या अनुदानासाठी अर्ज केला आहे.
त्यापैकी ११ हजार ९६१ रिक्षाचालकांचे अर्ज पात्र ठरले आहेत. तर, २९०८ रिक्षाचालकांना योग्य कागदपत्रे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य शासनाचे अनुदान अनेकांच्या थेट खात्यावर जमा झाले आहे. मात्र, काही जण अद्यापही लाभापासून वंचित आहेत. त्यांनी अर्ज दिला असला तरी कागदपत्रांच्या त्रुटींमुळे पुन्हा अर्ज करण्याच्या सूचना आरटीओने दिल्या आहेत.
दरम्यान , कागदपत्रे जमविताना रिक्षा चालकांची दमछाक होत आहे. सादर करण्यात आलेले नऊ अर्ज हे बस, टॅक्सी, स्क्रबची वाहने असल्यामुळे कायमस्वरूपी अपात्र ठरविण्यात आले आहेत.
















