- अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली; प्रशासनाचे आभार – सोमनाथ तापकीर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६. जून. २०२१) :- पालिका प्रशासनाने तापकीर मळा चौक ते पिंपरी गावाला जोडणारा पुलापर्यंतचा रस्ता तयार करण्याचे काम सुरु केले आहे. अनेक वर्षापासून हा प्रलंबित मार्ग सिमेंट काँक्रिटकरणाच्या प्रतीक्षेत होता. त्यासाठी रस्ता खोदून ठेवला होता. त्यामुळे अक्षरशः रस्त्याची चाळण झाली होती. मात्र, पावसाळ्यामुळे सिमेंट काँक्रिटकरणाला फाटा देत डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ तापकीर म्हणाले, पालिकेच्या ‘ ब ‘ व ‘ ग ‘ हद्दीतील प्रभाग क्रमांक २२ व २७ काळेवाडीतील तापकीर मळा चौक ते सुभाषचंद्र बोस चौकापर्यंतचा रस्ता सिमेंट काँक्रिटकरणासाठी उखडून ठेवला होता. सध्या पावसाळा सुरु आहे. त्यामुळे परिसरातील वाहने, नागरिक, वृद्ध, महिला, लहान मुले-मुली येथून ये-जा करताना चिखलात घसरून पडून छोटे-मोठे अपघात होत होते. त्यातून त्यांना गंभीर इजासुद्धा झालेली आहे.
काम कधी मार्गी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. याची दखल घेत, पालिकेकडे पाठपुरावा केला. पावसाळा संपेपर्यंत का होईना रस्त्यावरील राडारोडा उचलून रस्ता साफ केला. पालिकेने अखेर डांबरीकरण करण्यास अनुमती दिल्याने प्रत्यक्षात या मार्गाचे काम चालू झाले आहे. त्यामुळे त्यांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत.
















