- लक्षणे दिसताच डॉक्टरांशी संपर्क साधण्याचे पालिकेचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जून २०२१) :- कोरोनाची गंभीर लक्षणे व मधुमेह असणाऱ्या रुग्णांना म्युकरमायकोसिस होत आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम व खासगी रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरात म्युकरमायकोसिसचे २५२ रुग्ण आढळून आले आहेत.
त्यापैकी २०२ रुग्णांवर वैद्यकीय उपचार तर ५० रुग्णांवर शस्त्रक्रिया केली आहे. शस्त्रक्रिया झाल्यानंतर आठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. म्युकरमायकोसिस व इतर आजारांनी आजपर्यंत एकूण २६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनातून बरे झाल्यावर नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
तीव्र डोकेदुखी, ताप येणे, गालावर सूज येणे किंवा बधिरपणा येणे, नाक गळणे जबड्यातील हिरड्यांवर पू असलेल्या पुळ्या येणे वरच्या जबड्यातील दात हलणे, जबड्यातील टाळू आणि नाकातील त्वचा याचा रंग काळसर होणे, वरच्या जबड्यातील टाळूला किंवा वरच्या भागाला छिद्र पडणे ही लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.