- यंदाही अखंड हरिनाम सप्ताह वारकऱ्यांविनाच..
- १ जुलै दुपारी दोन वाजता पालखीचे पंढरीकडे प्रस्थान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७. जून. २०२१) :- जगगुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या ३३६ व्या आषाढी वारी पालखी सोहळ्यानिमित्त शुक्रवारपासून संस्थानच्या वतीने भजनी मंडपात मर्यादित लोकांच्या उपस्थितीत कोविडच्या सर्व नियमांचे पालन करून परंपरेप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात झाली आहे, अशी माहिती पालखी सोहळा प्रमुख अजित महाराज मोरे यांनी दिली.
या वेळी संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, सोहळाप्रमुख संजय महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे, संस्थानचे विश्वस्त माणिक महाराज मोरे, विशाल महाराज मोरे आदी उपस्थित होते. श्री संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान १ जुलै रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास होणार आहे. यानिमित्त परंपरेप्रमाणे हा अखंड हरिनाम सोहळा सुरू होणार आहे. यासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन केले जाणार आहे. तर भाविकांसाठी हा सोहळा व मंदिरदेखील बंद असणार आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर अखंड हरिनाम सप्ताह पालखी प्रस्थानानंतर पालखी व पादुका मंदिरातील भजनी मंडपातच ठेवून वारीतील नित्यनियमाचे कार्यक्रम होणार आहेत. यासाठी शासनाने काही नियम घातले आहेत, या नियमांचे पालन करणे संस्थानला अत्यावश्यक असणार आहे.
संस्थानच्या वतीने पालखी प्रस्थान सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. सोहळ्यासाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदीही करण्यात आली आहे. पालखी रथाची दुरुस्ती अंतिम टप्यात असून, पालखी रथ, अब्दागिरी, गुरूडटक्के, पूजेचे थाळ यांनाही चकाकी देण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. प्रस्थानापूर्वी हे काम पूर्ण होईल. पालखीतील गाद्या, लोड बदलण्यात आले आहेत. जरी, पटका व पताका नव्याने करण्यात आल्या आहेत. पखवाजाच्या वाद्या दुरुस्त करून घेण्यात आल्या असून, पानांना शाई लावण्यात आली आहे.
या वेळी पालखी प्रस्थान सोहळ्याला कोल्हापूरचे संभाजीराजे भोसले, खासदार श्रीरंग बारणे व आमदार सुनील शेळके आदी उपस्थित राहणार आहेत. सप्ताहमध्ये पहाटे ४ ते ६ महापूजा व काकडा आरती, सकाळी ८ वा. गाथा भजन, संध्याकाळी ५ ते ६ हरिपाठ, सध्याकाळी ७ ते ९ कीर्तन असा नित्यनियम असणार आहे.
















