- नऊ जणांना अटक; दोन फरार, ३३ लाखांचा मुद्देमाल जप्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जून २०२१) :- कुरुळी येथील व्ही.टेक इंडस्ट्रीज इंडीया प्रा. लि. या कंपनीच्या कंपाऊंड वॉलवरुन कंपनीच्या आवारात प्रवेश करून कंपनीतील सुरक्षा रक्षकाला चाकूचा धाक दाखवून तसेच त्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून हाताने मारहाण करून अंगावर चादर टाकून डांबून ठेवत टोळीने कंपनीवर दरोडा टाकला होता. दरोडेखोरांनी कंपनीमधील तांबे, पितळ या धातुचे टर्मिनल, लग्ज, वायरिंग, हार्नेस असे स्पेअर पार्ट आणि सिक्युरिटी गार्डचे तिन मोबाईल फोन, असा एकूण २५ लाख ८७ हजार २४७ रुपयांचा मुद्देमाल लुटूला होता. याबाबत चाकण पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.
दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी नऊ जणांना अटक केली असून त्यांचे दोन साथीदार फरार आहेत. अटक आरोपींकडून ३३ लाख ३४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक केलेल्या दरोडेखोरांकडून २५ लाख ७५ हजार ५४७ रुपयांचे तांबे-पितळ या धातुचे स्पेअर पार्ट, चार लाख रुपये किमतीचा टेम्पो (एम एच १४ / जी डी ७८२७), दोन लाख ९० हजारांच्या तीन दुचाकी, ६७ हजारांचे सात मोबाईल फोन, सुरक्षा रक्षकाचा काढून घेतलेला १५०० रुपयांचा एक मोबाईल, ६५० रुपयांचे कटावणी, चाकू, मिरची पूड, असा एकूण ३३ लाख ३४ हजार ६९७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
रोहन विजय सूर्यवंशी (वय २८, रा. कासारवाडी), राहुल अंकुश क्षीरसागर (वय २१, रा. काळा खडक वाकड), रतन महादेव दनाने (वय १९, रा. तळेगाव दाभाडे), अन्सार जुल्फीकार खान ( वय २५, रा. दापोडी), अब्दुल सत्तार करिम (वय २३, रा. दापोडी), अरबाज रईस शेख (वय २० रा. दापोडी), मीना अंकुश क्षीरसागर (वय ४०, रा. काळा खडक, वाकड), अर्जुन मोहनलाल भट (वय २४, रा. चिखली), विद्या मनोज मगर (वय २३, रा. तळेगाव दाभाडे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. किरण गिरी, हर्षद खान हे दोघेजण सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
दरोडेखोरांनी चोरलेला माल एका टेम्पोमधून नेला असल्याची माहिती सुरक्षा रक्षकांनी पोलिसांना दिली होती. पोलिसांनी टेम्पो मालकाची माहिती काढली. टेम्पो मालक आणि खब-यांकडून म्हाळुंगे पोलिसांना माहिती मिळाली की, दरोडेखोर लुटलेला माल विकण्यासाठी यमुनानगर निगडी येथे गेले आहेत. त्यानुसार पोलिसांनी यमुनानगर परिसरात सापळा लावला. लुटलेला माल एका ट्रान्सपोर्ट गोडाऊनमध्ये विकत असताना पोलिसांनी आरोपींची रंगेहाथ धरपकड केली. दरम्यान आरोपी आणि पोलीस यांच्यात झालेल्या झटापटीत दोन आरोपी पळून गेले. पोलिसांनी नऊ आरोपींच्या मुसक्या आवळल्या. त्यामध्ये दोन महिला दरोडेखोरांचा सहभाग आहे.
















