- काळेवाडीतील प्रकार; आरोपी अटकेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जून २०२१) :- काळेवाडीतून सरकारी रेशन दुकानातील माल काळ्या बाजारात चढ्या दराने विक्री केला जात आहे, अशी माहिती रविवारी (दि. २७) सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकातील पोलीसांना मिळाली. पोलिसांनी पवारनगर गार्डनच्या बाजूला काळेवाडी येथे सापळा लावून छापा टाकला.
त्यात दोन दुचाकी (एमएच १४ / ई एल ६५३८ आणि एमएच १४ / जी एल १५४७) वाहने पोलिसांनी जप्त केली. तसेच तिघांना ताब्यात घेतले. तिघांकडून ३७ हजार ४०० रुपये किमतीचे ३४ गव्हाचे पोते, ६७ हजारांच्या दोन दुचाकी, असा एकूण एक लाख चार हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
चंदन द्वारका गुप्ता (वय ३८), रितीक चंदन गुप्ता (वय १८, दोन्ही रा. रहाटणी, काळेवाडी, वाकड, पुणे), शंकर आयोध्या गुप्ता (वय २२, रा. साईनगर, कॉलनी क्रमांक चार, नखाते वस्ती, रहाटणी, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. रेशन दुकानदार थोरात (पुर्ण नाव माहित नाही, वय ४०, रा आनंदनगर झोपडपट्टी चिंचवड, पुणे), जांभळे (पूर्ण नाव माहित नाही, वय ३०, रा. आनंदनगर, झोपडपट्टी, चिंचवड, पुणे) यांच्या विरोधात जिवनावश्यक वस्तु अधिनियम १९५५ चे कलम ३, ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.
















