- आगामी निवडणुकीत अशा घरभेदींच्या सुळसुळाटावर आवर घालण्याकरीता शरद पवारांनी कठोर कारवाई करावी
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ जाने.) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने टाळगाव चिखली येथे ‘संतपीठ’ उभारण्यात येत आहे. संतपीठासाठी महापालिकेने ४० कोटी रुपयांचा खर्च गृहित धरला असताना, कंत्राटदारांनी जादा दराच्या निविदा भरल्या आहेत. त्याला पाच कोटी रुपये वाढीव दर दिला आहे, अशा एकूण ४५ कोटींच्या प्रस्तावास (२१ डिसें.) च्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
या वाढीव खर्चाच्या प्रस्तावावर विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महापौर राजू मिसाळ, नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, नगरसेविका प्रज्ञा खानोलकर, गीता मंचरकर या चार नगरसेवकांनी आपले म्हणणे मांडणे अपेक्षित होते. परंतु, त्यांनी स्थायी समितीमध्ये कोणतीही हरकत घेतली नाही. मात्र, आज (दि. ३) रोजी साने यांनी जाहीरपणे या निविदेला विरोध केला आहे. यात रिंग झाल्याचे साने त्यांचे म्हणणे आहे.
स्थायी समितीत या प्रस्तावास विरोध केला असता तर, हा विषय मंजूर झालाच नसता. स्थायीतील राष्ट्रवादीचे नगरसेवक या विषयावर गप्प बसले. याचा अर्थ सत्ताधारी भाजप आणि त्यांच्यात अर्थपूर्ण राजकारण होत आहे की काय? असा संशय वाटू लागला आहे. समितीमध्ये डोळ्यात धूळ फेकून सत्ताधाऱ्यांनी विषय रेटून नेला असताना, मुग गिळून गप्प बसणाऱ्या या चार नगरसेवकांची तक्रार मी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली आहे, असे साने यांनी सांगितले आहे.
अहमदनगर महापालिकेच्या महापौर निवडीत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिला होता. त्यावर भाजपला पाठिंबा देऊ नये, अशी सूचना केली असतानाही पक्षादेश झुगारून पाठिंबा देणा-या नगरसेवकांवर कारवाई करण्याचा निर्णय पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी घेतला होता. आता पिंपरी चिंचवड महापालिकेतही अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मी पक्षाध्यक्ष शरद पवार यांना महापालिकेच्या राजकारणात डोकावण्याची विनंती केली असून, आगामी निवडणुकीत या घरभेदींच्या सुळसुळाटावर आवर घालण्याकरीता शरद पवारांनी आताच कठोर निर्णय घेऊन, पक्षविरोधात भूमिका घेणाऱ्या या नगरसेवकांवर कारवाई करण्याची मागणी केली असल्याचे, दत्ता साने यांनी सांगितले आहे.











