- संतपीठाची उर्वरीत जागा ताब्यात घेण्यास आमदार महेश लांडगे अपयशी
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ जाने.) :- भागवत धर्माचा प्रसार आणि प्रचार व्हावा, वारकरी सांप्रदायाचे पारंपरिक शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे, याकरीता जागतिक दर्जाचे संतपीठ टाळगाव चिखलीत उभारण्यास राष्ट्रवादीच्या कार्यकाळापासून आम्ही पाठपुरावा करुन, काही जागा ताब्यात घेतली होती. आमची सत्ता गेल्यानंतर सत्तेवर आलेल्या सत्ताधारी भाजपने अद्यापही उर्वरीत एक हेक्टर ०६ आर जागा ताब्यात घेतलेली नाही. भाजपने संतपीठाच्या निविदा प्रक्रियेत रिंग केलेली आहे. रिंग दडपण्यासाठी काही मंडळी श्रेयाचे राजकारण करु लागली आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी भाजपवर प्रत्यक्ष पत्रकार परिषदेत केला आहे.
संतपीठाच्या विषयात आम्ही राजकारण करणार नाही. कारण, गावक-यांच्या मागणीनुसार त्यांची संकल्पना आम्ही मांडली होती. त्यामुळे संतपीठाचे श्रेय कोणी घेवू नये, त्यात राजकारणही करु नये. तसेच संतपीठाच्या एसव्हीपी कंपनीत महापालिकेचे सर्व पदाधिकारी व स्थानिक वारकरी साप्रंदाय ज्येष्ठांचा समावेश करणे आवश्यक आहे. त्या समितीत केवळ प्रशासकीय लोकांचा सहभाग करुन आयुक्तांनी प्रशासन राज आणण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही.
संतपीठाच्या रिंगचे कटकारस्थान महासभेत ऑडीओ क्लिपसह सादर करणार आहे. तसेच गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता असताना संतपीठाची उर्वरीत जागा ताब्यात घेण्यास आमदार महेश लांडगे अपयशी ठरले आहेत, असेही साने यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.











