- एकावर तलवार व कोयत्याने वार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जुलै २०२१) :- चिखलीत आरोपी व फिर्यादी यांच्या नातेवाईकांचे भांडण झाले होते. त्यावेळी फिर्यादी यांचा पुतण्या हा भांडणे सोडविण्यासाठी मध्ये पडला होता. त्याचा राग आरोपींच्या मनात होता. फिर्यादीचा पुतण्या हा सोमवारी (दि. १२) दुपारी पाटीलनगर, चिखली येथे त्याच्या घराजवळ असलेल्या बाकड्यावर बसला होता. त्यावेळी आरोपी तिथे आले.
त्यांनी ‘माझ्या गॅंग मधील मेंबरला नडतो का’, असे म्हणत आरोपींनी बेकायदेशीरपणे जमाव जमवून तलवारी, कोयते दाखवून दहशत माजवली. तसेच एकावर तलवार आणि कोयत्याने वार केले. त्यानंतर फावड्याच्या लाकडी दांडक्याने मारहाण करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मारुती बाजीराव मोरे (वय ४२, रा. पाटीलनगर, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सचिन नितीन गायकवाड, सुरज खपाले, ऋतिक उर्फ मुंग्या रोकडे, विशाल शिंदे, भीमा अशोक कांबळे (सर्व रा. चिखली गाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. विकास विष्णू मोरे असे जखमीचे नाव आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.