- स्थायी समितीकडून हिरवा कंदील..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जुलै २०२१) :- महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात सुरू असलेल्या रुबी एलकेअर या हृदयविकारांवर उपचार करणाऱ्या संस्थेला मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. कोरोना प्रादुर्भावातही या संस्थेकडून रुग्णांवर उपचार केले जात होते. या सर्व बाबींचा विचार करून पाच वर्षे मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव स्थायीच्या मान्यतेकरिता ठेवण्यात आला होता. त्यास स्थायी समितीने नुकतीच मान्यता दिली आहे.
महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात मिळणाऱ्या दर्जेदार वैद्यकीय उपचारामुळे केवळ शहरातीलच नव्हे तर राज्यभरातून रुग्ण दाखल होत असतात. याठिकाणी हृदयरोगाशी संबंधित उपचार परवडणाऱ्या दरांत उपलब्ध व्हावेत, याकरिता रुबी एलकेअर या संस्थेशी करारनामा करण्यात आला आहे. नागरिकांना या संस्थेच्या उपचारांचा फायदा व्हावा, याकरिता महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजना लागू करण्यात आली आहे. आजपर्यंत या योजनेचा हजारो रुग्णांना फायदा झाला आहे.
रूबी एलकेअर यांच्यासोबत २४ फेब्रुवारी २०१६ रोजी पाच वर्षे कालावधीसाठी करारनामा करण्यात आला होता. हा करारनामा पूर्वलक्षी प्रभावाने २६ सप्टेंबर २०१७ रोजी आमलात आला होता. करारनाम्याची मुदत फेब्रुवारी २०२१ रोजी संपुष्टात आली. हा करारनामा पाच वर्ष मुदतीसाठी २३ फेब्रुवारी २०२१ ते २२ फेब्रुवारी २०२६ पर्यंत वाढविण्यात आला आहे.












