- अन्यथा आ. लांडगेंच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन..
- नगरसेवक वसंत बोराटे यांचा महावितरणाला इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जुलै २०२१) :- विजेच्या लपंडावामुळे प्रभाग दोनमधील मोशी, बोऱ्हाडेवाडी परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. येत्या पंधरा दिवसांत वीज समस्या सुटली नाही, तर आंदोलन करू, असा इशारा नगरसेवक वसंत बोराटे यांनी महावितरणला दिला आहे.
कोविडमुळे सगळीकडे ऑनलाईन शाळा, तसेच वर्क फ्रॉम होम करण्याची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. ही सर्व कामे वीज सुरू असल्यास सुरुळीत होतात. मात्र, परिसरात सातत्याने विजेचा लंपडाव सुरू आहे. कोविडमुळे आधीच नागरिक आर्थिक संकटात आहेत. त्यात हे वीज समस्याचे संकट उभे आहे. मात्र, महावितरणच्या अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करून, येत्या पंधरा दिवसांत ही समस्या मार्गी लावावी. अन्यथा आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करू.
वीज समस्याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना सातत्याने सांगण्यात आले आहे. मात्र, त्यांच्याकडून वीज समस्यांबाबत अद्यापही तोडगा काढण्यात आलेला नाही. शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढते आहे. वीज कनेक्शन, मीटर याची संख्या वाढते आहे. मात्र, महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वाढत्या शहरीकरणानुसार पूर्वनियोजन करणे आवश्यक असल्याचे नगरसेवक वसंत बोराटे यांनी सांगितले.












