न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ जाने.) :- पिंपरी चिंचवड शहरातील बीआरटी मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. केवळ बसेस अभावी शहरातील बीआरटी मार्गावर बसेस धावू शकत नाहीत. त्यामुळे परिसरातील नागरिकांची कुचंबणा होत आहे.
शहरातील काळेवाडी फाटा ते देहू आळंदी रस्ता आणि बोपखेल ते आळंदी हे बीआरटीचे मार्ग बस धावण्यासाठी तयार आहेत. परंतु, बसेस नसल्यामुळे या परिसरातील बीआरटी दळणवळन ठप्प आहे. त्याकरीता २० बसेस खरेदी करण्याची पिंपरी चिंचवड महापालिकेला आवश्यकता वाटत आहे. बस खरेदीसाठी पीएमपीएमएल प्रशासनाने पिंपरी चिंचवड महापालिकेस एनओसी प्रमाणपत्र देण्याची मागणी महापौर राहुल जाधव यांनी केली आहे.
पीएमपी प्रशासन पिंपरी-चिंचवड महापालिकेतील संचालक मंडळातील सभासदांना कोणत्याही निर्णयप्रक्रियेत सहभागी करून घेत नाही. त्यांना विश्वासात न घेता पीएमपी प्रशासन परस्पर निर्णय घेत आहे. गैरव्यवहाराचे आरोप असलेल्या अधिका-यांना पदोन्नती दिली जाते. बसेसची संख्या अपुरी असल्यामुळे महापालिकेने ४०० बसेस खरेदीचा विषय मंजुर केला आहे. ४० टक्के हिश्याप्रमाणे शहराला १८० बसेस मिळणार आहेत. याबाबत पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अध्यक्षा नयना गुंडे यांना महापौर राहुल जाधव यांनी पत्र पाठविले असून, २० बसेस खरेदीसाठी एनओसी देण्याची मागणी केली आहे.


















