- चिंचवड येथील घरी तासभर चर्चा; राजकीय क्षेत्रात खळबळ…
- नगरसेवक शैलेश मोरेंकडून सारवासारव..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जुलै २०२१) :- भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी आज बुधवारी (दि. २१) रोजी कोणताही नियोजित दौरा नसताना पिंपरी-चिंचवड शहरात येवून प्रभाग क्रमांक १९ चे भाजप नगरसेवक शैलेश मोरे यांच्या चिंचवड येथील घरी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांचे स्वागत करण्यात आले.
तिथे त्यांनी नगरसेवक शैलेश मोरे यांच्याशी शहरातील घडामोडीबाबत तासभर चर्चा केली. भेटीदरम्यान शैलेश मोरे यांनी आपल्याला पदाधिकारी निवडीत कसे डावलले जाते? त्याचा पाढाच वाचून दाखविला. तरीही पक्षाची साथ अबाधित ठेवली आहे, असे त्यांनी निक्षून सांगितले. भविष्यात मी भाजपसोबतच राहणार असून पक्षाने माझ्यावरील अन्याय दूर करून मला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही मोरे यांनी चंद्रकातदादांकडे केल्याचे सूत्रांकडून समजते.
२०१७ मध्ये भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले नगरसेवक शैलेश मोरेंकडे पक्षश्रेष्ठींनी कायमचा दुर्लक्ष करीत त्यांना पदापासून डावलले. कुठलेही मोठे पद न देता त्यांना कायम झुलवत ठेवले आहे. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. जवळच्या कार्यकर्त्यांकडून ही भेट केवळ सदिच्छा भेट असल्याचं सांगितल जातंय.
चंद्रकांतदादा हे त्यांच्या खासगी कार्यक्रमाच्या निमित्ताने शहरात आले होते. त्यावेळी ते माझ्या घरी चहापानसाठी आले होते. त्यात कोणतीही चर्चा झाली नाही. ही भेट कोणत्याही चर्चेसाठी नव्हे तर सदिच्छा भेट होती.
– मा. शैलेश मोरे (भाजप नगरसेवक)….