- त्या पत्राशेडला पालिकेचे अभय मात्र, इतर अनधिकृत पत्राशेडवर मारला हातोडा
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ जाने) :- महापालिकेने पिंपळे गुरवमधील पूररेषेतील अनधिकृत पत्राशेडवर कारवाई केली. मात्र, ही कारवाई करताना विद्यमान नगरसेविकेच्या नदीपात्रात भराव टाकून उभारण्यात आलेल्या सुमारे दोन हजार स्क्वेअर फूट पत्राशेडवर मात्र महापालिका अधिकाऱ्यांनी कृपादृष्टी दाखवली आहे.
महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाच्या वतीने पूररेषेतील अनधिकृत बांधकामे पाडून टाकण्यात येत आहेत. पिंपळे गुरवमध्ये तब्बल ६० पत्राशेडवर कारवाई करण्यात आली. मात्र, विद्यमान नगरसेविका चंदा राजू लोखंडे या नगरसेविका पदावर असताना पिंपळे गुरव स्मशानभूमी शेजारील नदीपात्रात भराव टाकून दोन हजार स्क्वेअर फूट पत्राशेड उभारले आहे. ते सध्या भाडेतत्त्वावर देण्यात आले आहे. त्यावर मात्र महापालिका अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई न केल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
आपल्या नगरसेविका पदाचा गैरवापर करून स्वतःच्या पत्रा शेडवर कारवाई होऊ नये, याची सोयीस्कर खबरदारी घेतली. विशेष म्हणजे काही नगरसेवकांनी आयुक्तांची भेट घेत पिंपळे गुरवमधील विशिष्ट अनधिकृत पत्राशेडवर कारवाई करा अन्यथा राजीनामा देऊ, असे सांगितल्याचे समजते. त्यामुळे ही कारवाई वैयक्तिक हेवेदाव्यातून केल्याचे बोलले जात आहे. सर्वच अनधिकृत पत्राशेडवर सरसकट कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. आपले पत्राशेड वाचविणाऱ्या नगरसेविकेवर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर महापालिका आयुक्त काय कारवाई करणार, याबाबत नागरिकांमध्ये चर्चा आहे.
‘कारवाई करा, पण आमचे सामान तरी बाहेर काढू द्या’, असे आर्जव नागरिक करीत होते. मात्र, अधिकाऱ्यांनी गुंडाप्रमाणे अरेरावीची भाषा वापरत कारवाई सुरूच ठेवल्याने मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे नागरिकांनी सांगितले.
या कारवाईत एक पत्राशेड असे होते, ज्यात परिसरातील कचरा- वेचकांचे पन्नास मुले शिकत आहेत. आम्ही कुठल्याही मोबदल्याच्या अपेक्षेने वस्तीशाळा चालवत नाही. आज बाहेरच्या शाळेची फी या कुटूंबाना परवडत नाही आणि ही मुले स्वतःहुन शाळेत येत नाहीत. त्यांना शोधून आणावे लागते. त्यामुळे ही वस्तीशाळा मुलांसाठी महत्वाची होती. आता पत्राशेडवर कारवाई झाल्याने या मुलांची शाळा भरावयाची कुठे? हा प्रश्न आहे. – अरुण पवार (अध्यक्ष मराठवाडा जनविकास संघ)











