न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ जाने. ) :- पुणे-मुंबई महामार्गावरील कासारवाडी येथे मेट्रोचे पिलर उभे करीत असताना शनिवार (दि. ५) रोजी दुपारी अडीचच्या सुमारास अचानक क्रेन कोसळली व परिसरात हाहाकार उडाला. सुदैवाने दुपारची वेळ होती व रस्त्यावर वर्दळ कमी असल्यामुळे जीवितहानी टळली यात जीवीतहाणी झाली नसली तरी, क्रेन कोसळण्यापूर्वी अवघ्या काही सेकंदातच एक खासगी बस प्रवाशांना घेऊन मार्गस्त होत होती. क्रेन जमीनीवर कोसळण्यापूर्वी काही सेकंदातच बस पुढे गेल्याने बसमधील सर्व प्रवासी सुखरूप बचावले.
या घटनेची दखल घेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने नाशिक फाटा येथे आंदोलन करण्यात आले. राज्यातील निवडणुकीपुर्वी दापोडी ते पिंपरी मेट्रो सुरु करण्यासाठी खटाटोप करणाऱ्या भाजप सरकारचा गडबडघाई नागरिकांच्या जीवाशी बेतू शकते. एवढया कमी अंतराची मेट्रो सुरु करुन पिंपरी-चिंचवड सत्ताधारी भाजपला नवा इतिहास लिहण्याची लगीनघाई झाली आहे. पण ही लगीनघाई बरी नाही याचा प्रत्यय व मेट्रोचा भोंगळ कारभार समोर आला आहे, असा आरोप युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांनी केला आहे.
यावेळी पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, युवकचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, नगरसेविका सुलक्षणा धर शिलवंत, नगरसेवक राजू बनसोडे, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, अतुल शितोळे, प्रदेशचे संघटक विशाल काळभोर आदी उपस्थित होते.
आत्तापर्यंत झालेल्या कामाचे स्ट्रक्चरल सिक्युरीटी ऑडिट झाल्याशिवाय या पुढे मेट्रोचे काम सुरु करुन देणार नाही. या अपघाताला जबाबदार असणाऱ्या मेट्रो आणि सत्ताधारी भाजपाचा जाहीर निषेध करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी वाकडकर यांनी केली.















