- पालिकेकडून क्षेत्रीय कार्यालयाच्या दिमतीला मनुष्यबळाची कुमक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जुलै २०२१) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या पथकाकडून अनधिकृत बांधकामे, फ्लेक्स, अनधिकृत विक्रेते, हातगाड्या व टपऱ्यावर कारवाई केली जात आहे. ती कारवाई अधिक तीव्र व मोठ्या प्रमाणात करण्यासाठी पथकासाठी मनुष्यबळ वाढविण्यात आले आहे. त्यामुळे अतिक्रमण दूर होऊन शहर सुंदर करण्यास सहाय्य होणार आहे, असा दावा महापालिकेने केला आहे.
महापौर उषा ढोरे व आयुक्त राजेश पाटील यांनी सर्व क्षेत्रीय कार्यालयांना भेट देऊन तेथील नगरसेवक व अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. रस्ते व पदपथावरील अतिक्रमणे तातडीने हटविण्याचे आदेश महापौर ढोरे व आयुक्त पाटील यांनी संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. मात्र, क्षेत्रीय कार्यालयाच्या पथकाकडे पुरेसा प्रमाणात मनुष्यबळ नसल्याने कारवाईस मर्यादा पडत असल्याची बाब क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या निर्देशनास आणून दिली.
आयुक्तांनी क्षेत्रीय कार्यालयाच्या पथकास जादा मजूर व रखवालदार उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सर्व ८ क्षेत्रीय कार्यालय पथकांना प्रत्येकी ५ कर्मचारी देण्यात आले आहेत. आवश्यकतेनुसार कर्मचाऱ्यांची संख्या वाढविली जाणार आहे. त्या आधारे कारवाई मोहिम तीव्र केली जाणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.